आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत एकत्र पण, शिवसेना-भाजपचे विचार वेगवेगळे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची महायुती निश्चित होणार आहे, असा दावा करतानाच राज्यात सत्तेत आम्ही जरी एकत्र असलो तरी शिवसेना व भाजपचे विचार वेगवेगळे, दोन्ही पक्षाचे स्वतंत्र अजेंडे आहेत. भविष्यात पुढे देखील आम्ही एकत्रच राहणार आहोत, असे स्पष्टीकरण पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले. दरम्यान, नगर शहराची जागा भाजपला सोडावी, अशी मागणी पुढे येत असल्याबद्दल शिंदे यांनी हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री आल्यावर त्यांनाच विचारा, असे सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्व नियोजित महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमेटीची बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार वैभव पिचड, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, प्रकाश चित्ते, महाजनादेश यात्रेचे नियोजन प्रमुख प्रसाद ढोकरीकर, महापालिकेतील माजी गटनेते सुवेंद्र गांधी, किशोर बोरा आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत महाजनादेश यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात भाजप व शिवसेना एकत्र सत्तेत आहे. आम्ही सत्तेत जरी एकत्र असलो तरी दोन्ही पक्षाचे विचार वेगवेगळे आहे. अजेंडे वेगवेगळे आहेत. भविष्यातही आम्ही एकत्र राहणार आहोत. दोन्ही पक्षाची महायुती निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार व सोमवार असे दोन दिवस नगर जिल्ह्यात असणार आहे. रविवारी शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. शिर्डी येथून ते लोणी येथे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या घरी जाऊन सांत्वन करणार आहेत. त्यानंतर ते अकोलेकडे रवाना होणार आहेत. अकोले येथे कळस येथून त्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होणार आहे. तेथे सभा होणार आहे. त्यानंतर संगमनेर, कोल्हार, राहुरी येथील सभा आटोपून ते सायंकाळी नगरकडे प्रयाण करणार आहेत. नगर येथील गांधी मैदान येथे रविवारी सायंकाळी सात वाजता त्यांची सभा होणार आहे. रात्री त्यांचा मुक्काम नगरमधील शासकीय विश्रामगृहावर असणार आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन ते पाथर्डीकडे रवाना होणार आहेत. पाथर्डीतील सभा आटोपल्यानंतर ते माणिकदौंडी मार्गे ते आष्टीकडे जाणार आहेत. तेथे बीड िजल्ह्यातील पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर जामखेड येथे त्यांचे आगमन होणार असून, तेथे ते सभा घेणार आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांत त्यांच्या सहा सभा होणार आहेत. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. मुख्यमंत्री पाच वर्षात राज्य सरकारने केलेली कामे, मार्गी लागलेली प्रलंबित प्रश्न ते या यात्रेद्वारे मांडणार आहे, असे शिंदे म्हणाले.  पक्ष प्रवेशाच्या दृष्टिने विचार सुरू  मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत पक्ष प्रवेश होत नसल्याचे पक्षातील दिग्गज नेते सांगत असताना पालकमंत्री राम शिंदे यांनी मात्र पत्रकार परिषदेत पक्ष प्रवेशाच्या दृष्टिने विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा नव्याने विचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहाचा वापर  मुख्यमंत्र्यांच्या पूर्व नियोजित महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर जागेअभावी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्व-पक्षाचे कार्यालय सोडून शासकीय विश्रामगृहावर पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक घ्यावी लागली. विशेष म्हणजे पक्षाच्या बैठकांसाठी शासकीय विश्रामगृहाचा वापर कितपत योग्य आहे ? यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...