आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकाराचे कर्ज परत केले तरी ४० लाखांसाठी धमक्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंद्रुड- आठ वर्षापूर्वी सावकाराकडून ३ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी त्या मोबदल्यात चार एकर जमीन खरेदी खत करून देण्यात आली. कर्ज घेतल्यानंतर कर्ज व त्याचे व्याजही सावकाराला दिले. परंतु, सावकाराकडून ४० लाख रुपयांची मागणी केली जाऊ लागली. या प्रकरणी मृत कर्जदाराच्या भावाने दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सावकारासह त्याच्या भावावर गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच दोन्ही भाऊ पसार झालेत. 

 

दिंद्रुड येथील शेतकरी रामेश्वर गंगाराम उबाळे, भगवान गंगाराम उबाळे, सर्जेराव गंगाराम उबाळे व मृत शिवाजी गंगाराम उबाळे यांची एकत्रित १३ एकर जमीन दिंद्रुड शिवारात आहे. यातील शिवाजी उबाळे यांनी बेलुरा येथील सावकार विलास फपाळ यांना ३ लाख ६० हजाराच्या कर्जापोटी चार एकर जमीन नावे करून दिली होती. जमीन विक्रीचा व्यवहार अनधिकृत असल्याने रामेश्वर उबाळे यांनी येथील दिंद्रुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी म्हटले की, विलास अंगदराव फपाळ ( रा.शाहुनगर माजलगाव ) हे सावकारीचा व्यवसाय करत असून शिवाजी यांच्या नावावरील १ हेक्टर ७४ आर एवढी जमीन खरेदीखताआधारे उबाळे परिवाराला कोणतीही पूर्वसूचना न देता, सावकाराने त्याचा भाऊ दत्तात्रय फपाळ याच्या नावावर खरेदीखत करून घेतली. जमिनीचा ताबा आजपर्यंत उबाळे कुटुंबाकडे असून सावकार व त्याच्या भावाकडून जमीन दाखवण्यासाठी तक्रारदार उबाळे यांना धमकावत आहेत. या प्रकरणी दिंद्रुड ठाण्यात विलास अंगदराव फपाळ, दत्तात्रय अंगदराव फपाळ या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल झाला असून तपास माजलगाव पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री नवटक्के करत आहेत. या प्रकरणात आता काय कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. 

 

सावकाराकडून ४० लाखांची मागणी 
उबाळे यांच्या कुटुंबातील शिवाजी उबाळेंनी सावकाराकडून २०१० मध्ये ३ लाख साठ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा भरणा म्हणून २०१२ साली ३ लाख पन्नास हजार रुपये, २०१३ साली १ लाख साठ हजार रुपये, तर २०१५ मध्ये नऊ लाख रुपये असे १४ लाख रुपये शिवाजी व उबाळे बांधवांनी दिले होते. सतत फपाळ सावकाराच्या धमक्यांनी शिवाजी उबाळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. चार लाख पन्नास हजार रुपये देऊनही शेत जमीन खरेदी खत परत करण्यासाठी उबाळे कुटुंबाने मागणी केली असता सावकाराकडून 
चाळीस लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचे रामेश्वर उबाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...