आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये रे ये रे पावसा : पावसाळ्याचा महिना उलटला तरी लघु, मध्यम प्रकल्प कोरडेठाकच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिल्ह्यात यंदा पावसाळ्याचा एक महिना उलटून सुध्दा अद्यापपर्यंत एकही मुसळधार पाऊस झालेला नाही. जूनमध्ये पावसाने मिलिमीटरची शंभरी देखील गाठलेली नाही. वार्षिक सरासरीच्या केवळ १२.१ टक्के पाऊस रविवारपर्यंत (दि.सात) झाल्याने ओढ्या नाल्यासह नद्या वाहिल्या नाहीत. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पात पाणी साठण्याचा विषयच नाही. 


यावर्षी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल होईल असे अपेक्षीत होते. विशेषतः मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे शेतक-यांच्या इच्छा आकांक्षा उंचावल्या होत्या. परंतू सात जुलै उलटल्यानंतर सुध्दा मान्सूनने सलामी दिली नाही. जूनच्या तिस-या आठवड्यात पाऊस दाखल झाला खरा. परंतू तो पाऊस पेरणी योग्य ठरला नाही. जुलै उजाडल्यानंतर सुध्दा या जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस नाही. ७ जुलैपर्यंत केवळ ९३.९५ मिलीमीटर पाऊस झाला. परिणामी, जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. हे सारे प्रकल्प कोरडे ठाक आहेत. थेंबभर सुध्दा पाणी नाही, असे विदारक चित्र आहे. 


पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात शुक्रवार अखेर केवळ १००.४३९ दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. तो साठा मृत पाणी साठ्यात आहे. येलदरी जलाशयावर जिंतूर, परभणी या दोन शहरासह २३ गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. सिद्धेश्‍वर जलाशयावर पूर्णा शहरासह परभणी व पूर्णा तालुक्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.  सिद्धेश्‍वर जलाशयात ११३.२९५ दलघमी पाणी साठा उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पावर सेलू, मानवत व परभणी तालुक्यातील काही गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. तसेच ७ गावच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचीही दारोमदार अवलंबून आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीत ५६.०१ दलघमी पाणी साठा उपलब्ध आहे. मानवत तालुक्यातील  झरी प्रकल्पात १ टक्का पाणीसाठा आहे. या व्यतिरिक्त गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुदगल व मुळी या तिन ठिकाणच्या बंधार्‍यात उपयुक्त पाणीसाठा शिल्लकच नाही. केवळ दिग्रस (ता. पालम) येथील बंधार्‍यात ६३.५७० दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. 


जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्प, गंगाखेड तालुक्यातील मासोळी व पिंपळदरी तलावात पुरेसा पाणीसाठा नाही. निवळीवर १६ गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. तर मासोळीवर गंगाखेड तालुक्यातील बहुतांशी गावे अवलंबून आहेत. सद्यःस्थितीत या प्रकल्पात ४०४.६२० दलघमी एवढा पाणीसाठा आहे. 
 

 

२२ लघु प्रकल्पांनी गाठला तळ... 
परभणी तालुक्यातील पेडगाव , आंबेगाव(ता.मानवत) येथील तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. पाथरी तालुक्यातील झरी तलावात अल्पसा पाणीसाठा आहे. नखातेवाडी, तांदुळवाडी, राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, पिंपळदरी, दगडवाडी, डोंगरपिंपळा, भेंडेवाडी, देवगाव, जोगवाडा, बेलखळा, वडाळी, चाऱठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, कवडा, मांडवी, दहेगाव तलावात सुध्दा पाण्याचा ठणठणाट आहे.

बातम्या आणखी आहेत...