crime / गोव्यातील १० लाखांच्या दारूसह १० हजार रिकाम्या बाटल्या जप्त 

काळाबाजार राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जामखेड येथील हॉटेलवर छापा 

प्रतिनिधी

Aug 18,2019 12:01:00 PM IST

प्रतिनिधी |जामखेड/ नगर : गोव्यातील दारू दुसऱ्या बाटल्यांत भरून विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या जामखेड येथील अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी छापा टाकला. या कारवाईत गोव्यातील तब्बल दहा लाख रुपयांच्या दारूसह दहा हजार रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार पसार झाला आहे.

जामखेड हॉटेल साईराम येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महेश शिवाजी इकडे (रा. झिक्री, ता. जामखेड) व ऋषिकेश अशोक काकडे (रा. बोर्ले, ता. जामखेड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्यातील विदेशी मद्याचे ५७ बॉक्स, प्लास्टीकचे २८ हजार सिलकॅप, दोन हजार पत्री बुच, मेकडॉल व्हीस्कीचे अंदाजे सुमारे पाच हजार लेबल, व दहा हजार रिकाम्या बाटल्या असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल कारवाई हस्तगत करण्यात आला. त्याचबरोबर विदेशी मद्याची चाेरुन वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली इंडिगो कार (एमएच १२, केएन १९७७) जप्त करण्यात आली आहे. गुन्हयातील मुख्य सूत्रधार आरोपी भाऊसाहेब गरड हा फरार झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपाधीक्षक सी. पी. निकम, निरीक्षक ए. बी. बनकर, ए. व्ही. पाटिल, संजय सराफ, बी. बी. हुलगे, डी. बी. पाटील, रानमळकर आदींच्या पथकाने केली.
बनावट दारूमुळे पांगरमलची दुर्घटना घडल्यानंतर नगरमध्ये बनावट देशी, विदेशी दारूनिर्मितीचे अड्डे सुरूच असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. नगर शहरातील केडगाव परिसरातील एका खोलीमध्ये सुरू असलेल्या बनावट दारू अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महनाभरापूर्वीच छापा टाकला होता. बनावट विदेशी दारू निर्मितीसाठीची रसायने, मोकळ्या बाटल्या, बाटल्यांची हजारो झाकणे यावेळी जप्त करण्यात आली होती.
दोघांना अटक, मुख्य सूत्रधार मात्र पसार

नऊ जणांचा बळी तरी उद्योग सुरूच
२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवाराने वाटलेल्या बनावट दारूमुळे पांगरमल येथील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. पोलिस तपासात नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅन्टिनमध्ये बनावट दारू तयार होत असल्याचे यावेळी उघडकीस आले होते. त्यानंतरही नगर शहरातील व ग्रामीण भागातील बनावट दारू निर्मितीचे उद्योग थांबलेले नाहीत. बनावट दारूची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते.

हुबेहूब सीलबंद बॉटल
शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बनावट दारू निर्मितीचे अड्डे सुरू आहेत. या गोरखधंद्यात पटाईत असलेले आरोपी बनावट दारू वापरून हुबेहुब एखाद्या विदेशी कंपनीप्रमाणे दारू तयार करत आहेत. मागच्या महिन्यात केडगाव येथील दारू अड्ड्यावर पकडलेल्या आरोपीने तर बनावट दारू व त्याचे बॉटलींग याचे प्रात्यक्षिकच उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना दाखवले होते. काही मिनिटाच्या आत बनावट दारू तयार करून बाटली सिलबंद केली जाते. हीच दारू कमी किंमतीत शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये विक्रीसाठी पोहचवली जाते.

X
COMMENT