आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजारांवर शिवसैनिक पाेहाेचले; 17 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू, पण अजूनही तपासणी नाके नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या/लखनऊ - अयोध्येत २५ नोव्हेंबरला होणाऱ्या धर्मसभेसाठी देशभरातून लोक जमा होत आहेत. शहराचे रूपांतर छावणीत झाले आहे. पोलिसांव्यतिरिक्त सुरक्षा दलांच्या ४८ तुकड्या तैनात केल्या आहेत. आधी २० तुकड्या होत्या. ७० हजार जवानांनी मोर्चा सांभाळला आहे. ड्रोन कॅमेऱ्याने शहराची निगराणी केली जात आहे. १० हजार शिवसैनिक अयोध्येत आले आहेत. हॉटेल आणि गेस्ट हाऊस भरले आहेत. पोलिसांनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येची विभागणी ८ झोन आणि १६ सेक्टरमध्ये केली आहे. तेथे १७ जानेवारी २०१९ पर्यंत कलम १४४ लागू केले आहे. स्थिती बिघडण्याच्या शंकेने लोकांनी रेशन जमा करणे सुरू केले आहे.

 

कलम १४४ असूनही विश्व हिंदू परिषदेने गुरुवारी रोड शो केला. तो मुस्लिमबहुल भागांतून गेला. व्यापाऱ्यांनी रोड शोवर बहिष्कार टाकला. व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जनार्दन पांडेय म्हणाले की, आम्ही धर्मसभेला विरोध करू. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना काळा झेंडा दाखवू. महाराष्ट्रातून आलेले शिवसैनिक राम मंदिर कार्यशाळा, कारसेवकपुरम, हनुमानगढी आणि रामलला जन्मभूमीला येत आहेत. मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, दर्शनार्थींची संख्या यात्रेमुळे वाढली आहे की शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमामुळे हे सांगता येणे कठीण आहे.  

 

पोलिस म्हणाले : घाबरण्याची गरज नाही, २६ पर्यंत अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द  

अयोध्येत हायवेपासून शहरापर्यंत शिवसेनेचे होर्डिंग लागले आहेत. त्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य यांचे फोटो आहेत. धर्मसभेचे होर्डिंग कमी आहेत. ठिकठिकाणी जवान तैनात आहेत, पण सध्या चेकिंग पॉइंट नाहीत. मुख्य सचिव डॉ. अनुपचंद्र पांडेय, प्रमुख सचिव गृह अरविंदकुमार आणि डीजीपी ओ. पी. सिंह म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन होईल. घाबरण्याचे कारण नाही. २६ नोव्हेंबरपर्यंत सुटीवर जाऊ नये, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.  

 

 

राऊत म्हणाले-१७ मिनिटांत बाबरी तोडली, कायद्यास किती वेळ लागेल?  

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘१७ मिनिटांत बाबरी मशीद तोडली, कायद्यास किती वेळ लागेल? मंदिरविरोधक राहू शकणार नाहीत.’  

 

भाजप खासदार म्हणाल्या-वादग्रस्त स्थळी राममंदिर नव्हे, बौद्ध मठ स्थापन करा  

उत्तर प्रदेशच्या बहराईचच्या भाजप खासदार सावित्रीबाई फुले म्हणाल्या की, वादग्रस्त स्थळी राम मंदिराऐवजी बौद्ध मठ स्थापन करावा.

 

बाबरी मशिदीचे पक्षकार अन्सारी म्हणाले-धर्मसभा नव्हे, गर्दी जमल्याने भयभीत आहे  
बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी म्हणाले, अयोध्येत धर्मसभेला आक्षेप नाही. लाखो लोक जमल्याने भीती वाटते.  

 

अखिलेश म्हणाले-गर्दीमुळे जीवित आणि वित्तहानीची शक्यता, लष्कर बोलवा  
सप अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत गर्दी जमल्याने जीवित-वित्तहानीची शक्यता आहे. अयोध्येत लष्कर बोलवावे.  

 

भक्तमाल बागेत होणार धर्मसभा  

विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा अयोध्येच्या पूर्व भागातील भक्तमाल बागेत होईल. आठ लाख चौरस फुट परिसरात या धर्मसभेची तयारी केली जात आहे. १०० फूट लांब मंच तयार होत आहे. भक्तमाल बाग अयोध्या बायपासजवळ आणि वादग्रस्त स्थळापासून दूर आहे. तेथून रामभक्तांना दर्शनासाठी रामललापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल. धर्मसभा स्थळ तयार करण्यास शेकडो मजूर तैनात केले आहेत. चार टँकरने पाणी शिंपडले जात आहे.  

 

महाराष्ट्रातून तीन रेल्वे, डझनभर बसने शिवसैनिक अयोध्येला रवाना  

मुंबई, ठाणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक तीन विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. राज्यभरातून डझनभर बसने लोक अयोध्येत पोहोचले. मीरा-भाइंदर रेल्वेस्थानकातून ३०० शिवसैनिकांचा जत्था अयोध्येला रवाना झाला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना निरोप दिला. ते म्हणाले की, उत्तर भारतीय समाज विशेषत: हिंदी भाषक शिवसेनेशी जोडले जात आहेत. उत्तर भारतीय आणि मराठी भाषकांत जवळीक वाढेल. प्रवासाआधी शिवसैनिकांनी स्टेशनवर महाआरती केली. अयोध्येत जाणाऱ्यांत खासदार, आमदारांचा समावेश आहे. शुक्रवारी अयोध्येला जाणारी रेल्वे रद्द होण्याची अफवाही पसरल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. रेल्वेस्थानकांवर पोलिस दल तैनात केले आहे.  

 

न्यूयॉर्क टाइम्स : अयोध्येत मुस्लिम पुन्हा चिंतेत 

अयोध्येत मुस्लिम समुदायाचे लोक पुन्हा चिंताग्रस्त आहेत. हिंदू संघटना एकजूट होऊन अयोध्येत राम मंदिरासाठी ताकद लावत आहेत. १९९२ मध्ये अनेक हिंदूंनी अयोध्येत बाबरी मशीद पाडली होती. त्यानंतर दंगल झाली होती. त्यात २००० लोक ठार झाले होते. दंगलींचा परिणाम देशभर झाला होता. तेव्हापासून अयोध्येतील स्थिती बिघडली आहे.

 
बीबीसी : विहिंपकडून शिवसेना मुद्दा खेचणार? 
शिवसेना विहिंपकडून राम मंदिराचा मुद्दा खेचून घेणार का, धर्मसभा २५ नोव्हेंबरलाच का ठेवली, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची घोषणा एवढ्या घाईने का, असे प्रश्न बीबीसीने विचारले. प्रवीण तोगडियांनी आपल्या आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनेद्वारे अयोध्येत शक्तिप्रदर्शन केले आहे. उद्धव ठाकरेही त्याच हेतूने अयोध्येत येत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...