जालना / राज्यभरातील हजारो कैद्यांनी शेतीत घाम गाळून घेतले साडेतीन कोटींचे उत्पादन!

कारागृह स्तरावर क्रीडा स्पर्धांतून तणावमुक्ती 

Sep 09,2019 08:01:00 AM IST

जालना - राज्यभरात ५४ कारागृहांमध्ये कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांमुळे दररोज हजाराे कैदी येतात. कैद्यांत सुधारणा होण्यासाठी शासनाकडून विविध स्तरावर प्रयत्नही सुरू असून यामुळेच ‘कारागृह आता सुधारगृह’ या नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. कारागृहाच्या ताब्यातील जमिनी जास्तीत जास्त पिकाखाली आणून शिक्षा भोगल्यानंतर कैद्याचे पुनर्वसन होत असताना त्याला रोजगार निर्मिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शेतीसह व्यावसायिक प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. दरम्यान, २९ कारागृहांतील हजारो कैद्यांनी ३ कोटी ८६ लाख ३१ हजार ४९९ रकमेचे शेती उत्पादन घेतले आहे.


कारागृ़हांमधील बंदींना विविध सुखसोयी मिळण्यासाठी उपाहारगृह, मोफत पत्र, पुस्तके आणि ग्रंथालय, वर्तमानपत्रे, खेळ व क्रीडा, रेडिओ, टी. व्ही.वर सांस्कृतिक कार्यक्रम, योगासन व विपश्यना शिबिरे, मुलाखत व्यवस्था आदी उपक्रम राबवले जात आहेत. ३ मध्यवर्ती १४ जिल्हा तर १२ खुले कारागृहे आहेत. राज्यातील ५४ पैकी २९ कारागृहांमध्ये कैदी शेती करतात. शेती उत्पादनात भाजीपाला व अन्न धान्याव्यतिरिक्त फळे, दूध, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, अळंबी उत्पादन, चारा उत्पादन व शेणखत आदींचे उत्पादन घेतले जाते. या कारागृहांमध्ये गत वर्षांत ३ कोटी ८६ लाख ३१ हजार ४९९ एवढ्या रकमेचे शेती उत्पादन घेतले गेले. या कारागृहातील शेतीसाठी २ कोटी २६ लाख ७६ हजार ४९१ रुपये खर्च झाला आहे. यात अनेक साधनसामग्री खरेदी करावी लागली आहे. खर्च वजा करता या कारागृहांना १ कोटी ५९ लाख ५४ हजार ९२८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कारागृहाचे ताब्यातील जमीन जास्तीत जास्त पिकाखाली आणणे व शेतीपूरक जोडधंद्यांमधून रोजगार निर्मिती व कारागृह महसूल वाढीसाठी प्रयत्न होत आहेत. या विविध उपक्रमांमुळे बंदीवानांमध्ये सकारात्मक बदल होऊन शिक्षा भोगल्यानंतर त्यांना चांगल्या रीतीने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. कैद्यांमध्ये पक्के व कच्चे कैदी असा प्रकार असतो. त्यांना या सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेक किचकट प्रक्रियेतून यावे लागते. या कैद्यांना सुधारण्यासाठी कारागृह स्तरावर विविध उपक्रम आहेत. कैद्यांचा ताणतणाव कमी होण्यासाठी कारागृहांमध्ये नेहमीच क्रीडा स्पर्धांमध्ये विविध उपक्रम घेतले जातात.

अशी आहे शेतजमीन
२.५ : एकर बीड कारागृह
२४ : गुंठे औरंगाबाद कारागृह.
१.५ : एकर जालना कारागृह

भाजीपाल्यांना असा असतो भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन विभागाकडून दर ठरवले जातात. भोपळा, दुधी भोपळा, २४ रुपये, कोबी, गाजराला ११ ते १६ रुपये असा भाव दिला जातो. शेती उत्पादनांमध्ये मुळा, भेंडी, गाजर, कारली, काकडी, टोमॅटो आदी भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते.

आरोग्य शिबिर, योगासनांवर भर
जालना येथील कारागृहामध्ये सामाजिक संस्था, वकील संघाच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबवले जातात. विशेष करून आरोग्य शिबिरेही घेतली जातात. जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने बीड येथील कारागृहात कुटीर उद्योग सुरू होण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद येथे केवळ २४ गुंठेच शेतजमीन असल्यामुळे या ठिकाणाहून पिकांचे उत्पन्न घेता येत नाही. परंतु, या ठिकाणी शिवणकाम प्रशिक्षणासह आरोग्य शिबिरे घेऊन आरोग्य तपासणीसह प्राणायाम, योगासनांसारखे उपक्रम राबवले जातात.

X