आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंना ‘कॅबिनेट’च्या आशेने हजारो रिपाइंचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मिळणार हे गृहीत धरून रिपाइंचे हजारभर कार्यकर्ते रेल्वे, विमानाने दिल्लीला निघाले आहेत.

 
२०१४ लोकसभा निवडणुकीत आठवलेंचा रिपाइं महायुतीत होता. त्यांना साताऱ्याची जागा दिली होती. आठवले यांना राज्यसभेवर घेत केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आले. २०१९ च्या निवडणुकीत मात्र रिपाइंला राज्यात एकही जागा सोडण्यात आली नव्हती. तरी आठवले यांना या वेळी पुन्हा केंद्रात मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. उलट या वेळी आपल्याला स्वतंत्र प्रभार किंवा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. बुधवारी दिल्लीत आठवले यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी आठवले यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिल्याचे रिपाइंतील सूत्रांनी सांगितले.  राज्यातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. राज्यात घडलेल्या भीमा कोरेगाव हिंसाचाराने फडणवीस सरकारच्या प्रतिमेला तडा बसला असून अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकते. त्यामुळे आठवले महायुतीसाठी महत्त्वाचे मोहरे ठरणार आहेत. त्यामुळे आठवले यांची केंद्रात पुन्हा वर्णी लागू शकते.   

 

राज्य मंत्रिमंडळातही रिपाइंला राज्यमंत्रिपद मिळणार
१७ जून रोजी राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होईल. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन रिपाइंला एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आठवले यांनी अविनाश महातेकर यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित केल्याचा सूत्रांचा दावा आहे. आठवले यांची मे २०२० मध्ये राज्यसभेची मुदत संपत आहे. त्यांना पुन्हा राज्यसभा देण्याचे आश्वासन भाजपने दिल्याचेही रिपाइंचे म्हणणे आहे. राज्यातून अर्थतज्ज्ञ डाॅ. नरेंद्र जाधव या अन्य एका आंबेडकरवादी नेत्यास भाजपने राज्यसभेवर घेतलेले आहे.