आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालयात तारखेवर हजर राहिल्यास ठार मारू; पिस्तूल राेखून फिर्यादीस धमकावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- न्यायालयात सुरू असलेल्या खून खटल्यातील तारखेवर हजर राहायचे नाही, असे धमकावत दोन टवाळखोरांनी थेट फिर्यादीच्या पोटावर पिस्तूल ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री ८.३० वाजता पांडे चौकातील रामदेवबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. शहरात सर्रास पिस्तूल बाळगणारे तरुण फिरत असल्याची आठवड्यात ही तिसरी घटना आहे. 

भूषण सुरेश पाटील (वय २५, रा. गणेशवाडी) या तरुणास टवाळखोरांनी धमकी दिली. भूषणचा मोठा भाऊ चंद्रकांत सुरेश पाटील याचा १४ मे २०१५ रोजी रात्री सहा तरुणांनी चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून, भूषण फिर्यादी आहे. या गुन्ह्यात चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे, लखन दिलीप मराठे, सनी उर्फ चालीस वसंत पाटील, ललित उर्फ सोनू गणेश चौधरी, लक्ष्मण दिलीप शिंदे व सागर वासुदेव पाटील या सहा जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले आहे. यातील चेतन व लखन हे सध्या कारागृहात आहेत. इतर चार संशयित जामिनावर मुक्त आहेत. न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शनिवारी दिवसभर मृत चंद्रकांतचा भाऊ तथा फिर्यादी भूषण पाटीलची उलटतपासणी न्यायालयात झाली. रात्री ८.३० वाजता ताे दुचाकीने घरी जात असताना रामदेवबाबा मंदिराजवळ दुचाकीवरील दोन टवाळखोरांनी त्याचा रस्ता अडवला. एकाने शिवीगाळ करीत त्याच्या पोटावर पिस्तूल लावले. 'यापुढे कोर्टात तारखेवर येऊ नकाे, नाहीतर मारून टाकू' अशी धमकी दिली. त्यांच्या दुचाकीवर १३ क्रमांक असल्याचे भूषणने पाहिलेे. यानंतर त्याने अप्पर अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली. रविवारी दुपारी २ वाजता भूषणने एमआयडीसी पोलिसात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार अदखपात्र गुन्हा दाखल झाला. 

 

उघड्यावर पिस्तूल बाळगून दहशत; आठवडाभरात घडलेली तिसरी घटना 
१ शहरात टवाळखाेर सर्रास पिस्तूल वापरत असल्याच्या तीन घटना एका आठवडाभराच्या आत समोर आल्या आहेत. ३१ डिसेंबर रोजी माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर दोन तरुणांनी सुपारी घेऊन गोळीबार केला. 
२ गुरुवारी (३ जानेवारी) न्यायालयात साक्षीसाठी आलेले गोपाळ साळुंके यांना न्यायालयाच्या आवारातच मारहाण केली. फरफटत चारचाकीतून घेऊन गेल्यानंतर त्यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखण्यात आले होते. 
३ शनिवारी (दि.५ जानेवारी) रात्री भूषण पाटील याच्या पोटावर दोन टवाळखोरांनी पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी दिली. शहरात सर्रासपणे पिस्तूल बाळगले जात असून, पोलिसांचा धाक संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. 

 

सुनावणीनंतर चिंग्या शहरात हॉटेलात जेवला, अन‌् घरीही गेला 
शनिवारी सुनावणी झाल्यानंतर सायंकाळी चेतन उर्फ चिंग्या हा संशयित मित्राच्या चारचाकीने कारागृहाच्या गार्डसह आकाशवाणी चौकातील एका हॉटेलात जेवणासाठी गेला. तेथून ईश्वर कॉलनी येथे कुटुंबीयांची भेट घेतली. हा प्रकार भूषणच्या लक्षात आल्यानंतर त्याने अप्पर अधीक्षक मतानी यांच्याकडे तक्रार केली. मतानी यांनी भूषणसोबत दोन पोलिस कर्मचारी पाठवून चिंग्याच्या घरी तपासणी केली. तत्पूर्वी चिंग्या व गार्ड हे तेथून निघून गेले होते. चिंग्या खरोखर घरी आला होता का? याची खात्री करण्यासाठी भूषणने लागलीच कारागृहात जाऊन चौकशी केली. रात्री ७.५४ वाजेपर्यंत चिंग्या कारागृहात परतलेला नसल्याचे आढळून आले. सायंकाळी ५ वाजेपूर्वीच न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत संशयित चिंग्या कारागृहात आला नसल्यामुळे भूषणने कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. 

आतापर्यंत सात 'एनसी', फिर्यादीला धोका: चंद्रकांत पाटील याच्या खून खटल्याची सुनावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत सात वेळा फिर्यादी भूषणला वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या आल्या आहेत. त्याने प्रत्येकवेळी पोलिसांची भेट घेऊन मदत मागितली; परंतु पोलिस दप्तरी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेत त्याची चौकशी झालेली नाही. अखेर आता धमकी देणाऱ्यांनी पिस्तूलसारख्या शस्त्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फिर्यादी भूषण यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. 

 

कारागृहातील 'बड्या' कैद्यांची बडदास्त 
कारागृहात 'बड्या' कैद्यांची बडदास्त ठेवण्यासाठी तेथील अधिकारी, तत्पर असतात, ही शाेकांतिका आहे. गतवर्षी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या धुळे येथील राजकीय बंदींना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू असल्याच्या नावाने दिवसभर शहरात फिरवले होते. या प्रकरणात दोन पोलिस कर्मचारी निलंबित झाले आहेत. अशी अनेक उदाहरणे समोर असताना कारागृहातील कर्मचारी कैद्यांना मदत करीत असतात. रविवारी चिंग्याला हॉटेलात जेवणासाठी नंतर घरी भेटीसाठी घेऊन गेले होते.