आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात चोवीस तासांत तीन अपघात; दोन ठार, चार जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - जिल्ह्यात गत २४ तासांत झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. अंबाजोगाई, शिरुर व पाटोदा तालुक्यात हे अपघात झाले. 


अंबाजोगाई तालुक्यातील उजनी पाटीजवळ शनिवारी रात्री आठच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकून  चुलत्याचा मृत्यू तर पुतण्या जखमी झाला.  शंभू गोविंद दहिफळे (वय ४०),  राहुल विश्वनाथ दहिफळे (वय २०) हे दोघे दुचाकीवरून अंबाजोगाईहून कोळवाडी (ता. अहमदपूर, जि. लातूर) या आपल्या गावाकडे जात असताना कोळवाडीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला त्यांची दुचाकी धडकली. अपघातात शंभू दहिफळे यांचा मृत्यू झाला तर राहुल दहिफळे जखमी झाले. दुसरा अपघात रविवारी पाटोदा तालुक्यातील नायगावजवळ घडला. रामदास बलभीम कैतके (वय ३२, रा. काठवठवाडी ता. बीड) हे सेंट्रिंगच्या कामासाठी नायगावकडे  दुचाकीवरून (एम एच २३, ३२३४) जात असताना नायगावजवळ वळणावर ट्रकने (एम एच १२, सीटी ७४३४) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कैतके गंभीर जखमी झाले.  जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले. 


तिसरा अपघात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर फुलसांगवी फाट्याजवळ घडला. पाथर्डीहून मादळमोहिकडे जाणारे अर्जून उर्फ बाबुराव राख (५२, रा. बोरगाव चकला ता शिरुर) यांच्या दुचाकीला समोरुन आलेल्या  जीपने  धडक दिली. यात  राख यांचा जागीच मृत्यू झाला तर जीप उलटल्याने दोन जण जखमी झाले.