आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना : मराठवाड्यात विविध ठिकाणी तीन अपघात; तीन ठार, पाच जण गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - औरंगाबाद - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा येथील बाह्यवळण रस्त्यावर दुचाकीला भरधाव जीपने धडक दिली. यात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.


सतीश सारंगधर मोरे (३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (२३, रा. चांदेगाव, ता. बीड) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे बीडहून चौसाळ्याकडे दुचाकीवरून (एमएच २३ आर ६४०) जात होते, तर  जीप(एमएच २३ एडी ४४६२) चौसाळ्याहून बीडकडे जात होती. बाह्यवळण रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर चौकालगत जीपने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चौसाळा चौकीच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु दोघांचाही अगोदरच मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास खाकरे व डॉ. अंकुश मंचुके यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी जीपचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला.

 

दीड महिन्यापूर्वीच विवाह
अपघातातील मृत सतीश मोरे याचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी,  आई-वडील, एक भाऊ, बहिणी आहेत, तर धनंजय कोल्हे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून चौसाळा परिसरावर शोककळा पसरली आहे.

 

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

गारज - शिऊर बंगला येथून गारजकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील वाघला फाटा येथे घडली. वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव बुद्रुक येथील माणिक शंकर तुपे व नानासाहेब जनार्दन तुपे शिऊर बंगला येथून  गारजकडे दुचाकीवरून येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात माणिक शंकर तुपे (५५)  जागीच ठार झाले, तर नानासाहेब तुपे गंभीर जखमी झाले. मृत माणिक तुपे हे बाभूळगाव बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थेचे चेअरमन आहेत.

 

लिंबाळा पाटीजवळ पिकअप - कारचा अपघात

परभणी - राज्य महामार्ग क्रमांक २ असलेल्या जिंतूर ते औंढा रस्त्यावर लिंबाळा पाटीजवळ पिकअप गाडी व बलेनो कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. जिंतूरपासून जवळच असलेल्या लिंबाळा पाटीजवळ सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बलेनो कार व पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील राजू गवारे, सागर वर्मा, पीयूष कुमार (सर्व रा. नांदेड) व पिकअप व्हॅन मधील समीर बागवान (रा.जामनेर) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर परभणीत उपचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...