नाशिकजवळ उसाच्या शेतात / नाशिकजवळ उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे 

प्रतिनिधी

Feb 07,2019 08:28:00 AM IST

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून गंगापूर रोड, मखमलाबाद, एकलहरे परिसरात बिबट्याने नागरिकांच्या उरात धडकी भरवल्यानंतर शेवगे दारणा आणि पळसेच्या शिव हद्दीवर ऊसतोड करणाऱ्या कामगारांना सव्वा ते दीड महिन्याचे बिबट्याचे तीन बछडे सापडले. परिसरात बिबट्याच्या मादीचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाल्याने भयभीत कामगारांनी लागलीच ऊसतोड बंद केली.

शेतकरी भाऊसाहेब शामराव गायधनी, सागर कासार, राहुल गायधनी यांनी या बछड्यांना सुरक्षित स्थळी हलवले अाणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती कळविली. या वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊसतोडणी कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या. तसेच, तातडीने कॅमेरा, रेस्क्यू टीम तैनात करून शेतकरीवर्गाला धीर दिला. परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यासह नगरसेविका सरोज आहिरे यांनी लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, विजयसिंग पाटील, जी. बी. पंढरे यांनी बछडे क्रेटमध्ये ठेवले. दरम्यान, परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हाताला मऊ लागले.. अन‌् बछडे दिसले
सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ऊसतोड करीत असताना हाताला मऊ लागले. बारकाईने पाहिले असता बिबट्याचे तीन बछडे दिसले. त्याचक्षणी ऊसतोड थांबवून जीव मुठीत धरून पळ काढला. सविता अहिरे, ऊसतोड कामगार

X
COMMENT