आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीती अन‌् दहशत: बिबट्यांचे दर्शन हाेताच ऊसताेड कामगारांनी काढला पळ; परिसरात घबराट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली कॅम्प - गेल्या काही दिवसांपासून गंगापूररोड, मखमलाबाद, एकलहरे परिसरात बिबट्याने नागरिकांच्या उरात धडकी भरवल्यानंतर मंगळवारी सकाळी शेवगेदारणा आणि पळसेच्या शिव हद्दीवरील शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांना सव्वा ते दीड महिन्याचे बिबट्याचे तीन बछडे सापडले. परिसरात बिबट्याच्या मादीचे वास्तव्य असल्याचे यातून सिद्ध झाल्याने भयभीत कामगारांनी लागलीच ऊसतोड बंद केली. 


शेतकरी भाऊसाहेब श्यामराव गायधनी, सागर कासार, राहुल गायधनी यांनी या बछड्यांना सुरक्षितस्थळी हलविले अाणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती कळविली. 

यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊसतोडणी कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या. तसेच, तातडीने कॅमेरा, रेस्क्यू टीम तैनात करून शेतकरीवर्गाला धीर दिला. परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासह नगरसेविका सरोज आहिरे यांनी लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, विजयसिंग पाटील, जी. बी. पंढरे यांनी बछडे क्रेटमध्ये ठेवले. वनविभागाच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेचे शेतकऱ्यांनी काैतुक केले. 


तिन्ही बछडे घेऊन मादी सुरक्षित ठिकाणी 


मादीच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद 

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछडे असलेले क्रेट रात्री पुन्हा जेथे सापडले त्या ठिकाणी ठेवले. त्यासोबत कॅमेराही लावून ठेवला होता. साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास बिबट्याच्या मादीने पायाने क्रेट पाडले. त्यामधील दोन बछडे तोंडात घेतले तर एक सोबत घेऊन मादी सुरक्षित ठिकाणी गेली. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बुधवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात पुन्हा ऊसतोड सुरू करण्यात अाली. वनअधिकारी विजय पाटील, रामदास पाळदे, राजेंद्र ठाकरे, पोलिसपाटील सुनील गायधनी, शेतकरी राहुल गायधनी दिवसभर तेथे होते.  बुधवारी दिवसभर बिछडे सापडलेल्या शेतात वनविभाग पथकाच्या बंदाेबस्तात ऊसताेड करण्यात अाली. 

 

..ताेपर्यंत शेतकऱ्यांचा जीव मुठीतच 
कामगारांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात बुधवारी ऊसतोड केली. मात्र, मादी बछड्यांना घेऊन बाजूच्याच उसात गेली असल्याच्या शक्यतेने परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात भीती कायम आहे. जोपर्यंत बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना जीव मुठीत धरूनच वावरावे लागणार असल्याची चर्चा सुरू होती. 

 

हाताला मऊ लागले.. अन‌् बछडे दिसले 
सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ऊसतोड करीत असताना त्यांना हाताला मऊ लागले. बारकाईने पाहिले असता बिबट्याचे तीन बछडे दिसले. त्याचक्षणी ऊसतोड थांबवून जीव मुठीत धरून पळ काढला. - सविता अहिरे, ऊसतोड कामगार 

 

बातम्या आणखी आहेत...