आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून तीन सख्ख्या भावांचा खून : माझ्यासमोर वडिलांसह दोन चुलत्यांना संपवले; याला संपवा म्हणाले, पण पळून गेल्याने वाचलो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - शेतीच्या वादातून तीन सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बीडजवळील वासनवाडी शिवारात शनिवारी सकाळी वाजता घडली. मोठा भाऊ, त्याच्या दोन मुलांनी साथीदारांच्या मदतीने या हत्या केल्या. 


प्रकाश काशीनाथ पवने (५५), दिलीप काशीनाथ पवने (५०)  व किरण काशीनाथ पवने (४०, सर्व रा. माळी गल्ली, बीड) अशी मृत तिघांची नावे आहेत. तर किसन काशीनाथ पवने व त्याची मुले डॉ. सचिन व अॅड. कल्पेश यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हे खून केले. चार भावंडांचे पवने कुटुंब एकत्रित असताना किसन यांच्या नावे १२ एकर जमीन खरेदी करण्यात आली होती. चौघे भाऊ विभक्त झाल्यानंतर किसनने ही जमीन इतर भावांना देण्यास नकार दिला होता. यामुळे अनेक वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, या जमिनीवर प्लॉटिंग करून जमीन विक्री करण्याचा विचार किसन आणि त्याच्या दोन्ही मुलांनी केला होता. यासाठी शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने वासनवाडी शिवारातील जमिनीचे सपाटीकरण करत असताना प्रकाश, दिलीप व किरण यांनी या कामाला विरोध करत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्लॉटिंग करता येणार नाही, असे सांगितले. यानंतर दोन्ही गटांत शाब्दिक चकमक झाली. मात्र, तयारीनिशी आलेल्या किसन व त्याच्या मुलांनी मित्रांच्या साहाय्याने दिलीप, किरण व प्रकाश यांच्यावर हल्ला केला. शस्त्राने त्यांच्यावर वार केले. यात दिलीप व प्रकाशचा जागीच मृत्यू झाला, तर किरणचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.  

 

रात्रीच झाला होता वाद, अदखलपात्र गुन्हा नोंद  : 

किशोरने सांगितले, जमिनीच्या वादातून किसन व त्याच्या तिन्ही भावांत सातत्याने वाद होत असत.  शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास िकसनचा मुलगा अॅड. कल्पेश हा त्याच्या एका मित्रासह दिलीप, प्रकाश व किरण राहत असलेल्या माळीगल्ली भागातील घरी आला होता. जमिनीच्याच प्रकरणातून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर दिलीप यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन कल्पेश व त्याच्या मित्राविरोधात तक्रारही दिली होती.

 

एसपींसह पथकांच्या भेटी :

वासनवाडी शिवारातील घटनास्थळी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्यासह बीड ग्रामीण ठाण्याचे एपीआय सुजित बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बाळासाहेब आघाव, पीएसआय विशाल शहाणे व एलसीबी, एडीएस, आय बाइक, फॉरेन्सिक मोबाइल व्हॅन, ठसेतज्ञ यांच्या पथकांनी भेटी देत पाहणी केली.

 

घटनास्थळी आढळली मिरची पूड :  

जमिनीच्या प्लॉटिंग प्रकरणात विरोध होणार हे गृहीत धरून विरोध होताच प्लॉटिंगच्या आड येणाऱ्यांना संपवण्याचे किसन, सचिन व कल्पेश यांनी ठरवलेच होते. यासाठी इतर साथीदार शस्त्र व मिरची पूड घेऊन तयार ठेवले होते. मिरची पूड टाकून शस्त्रांनी वार करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना मिरची पूड आढळून अाल्याची माहिती सूत्रांनी दिली.