आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भातुकलीचा खेळ खेळत होती मुले..जनावरांच्या गोठ्याला लागली भीषण आग, तीन मुलांचा होरपळून मृत्यू, भोकरदनमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन/ पिंपळगाव रेणुकाई - गोठ्यामध्ये भातुकलीचा खेळ खेळताना तीन चिमुकल्यांनी छोटी चूल पेटवली आणि चारा, भुशाच्या गंजीला आग लागल्याने तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथे सोमवारी सकाळी ११ वा. ही घटना घडली. वेदांत विष्णू मव्हारे (७), संजीवनी गजानन मव्हारे (४) आणि सार्थक मारुती कोलते (५) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. 

 

विष्णू मव्हारे यांच्या शेतातील गोठ्यात दोन्ही भावंडे व शेजारील सार्थक खेळत होता. सकाळी विष्णू शेतात गेले व पत्नीला मुलांकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. पत्नी घरकामात व्यग्र झाली. आगपेटीशी खेळताना चारा, भुशाच्या गंजीला आग लागली. मुले घाबरली आणि त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. वाऱ्यामुळे गोठ्यातील चारा आणि पऱ्हाटीने पेट घेतला. छपराच्या बाजूने जास्त पेट घेतल्याने पत्रे खाली पडले. अगोदरच भाजलेली मुले पत्रे पडल्याने बाहेर येऊ शकली नाहीत आणि त्यांचा करुण अंत झाला. शेतकऱ्यांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. भोकरदनमधून अग्निशमन दलाचे बंब आले. आग विझल्यानंतर तिघांचे मृतदेह दिसले. दुपारी तिघांवर क्षीरसागर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

वेदांत म्हणत होता बाबा सोबत येऊ द्या, पण त्याला काळ घेऊन गेला 
बाबा मला तुमच्यासोबत येऊ द्या, असा बालहट्ट चिमुकल्या वेदांतने धरला. पण वडिलांनी चॉकलेट देऊन त्याची समजूत काढली. त्यानंतर वेदांतसह तीन मुले अागपेटीशी खेळत असताना चारा आणि भुशाच्या गंजीला आग लागली. या आगीमुळे मुले घाबरुन गोठ्यात गेली. परंतु, वाळलेला चारा, पऱ्हाटीच्या आगीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्यामुळे चाऱ्याने अधिकच पेट घेतला आणि रौद्र रूप धारण केलेल्या आगीत काही क्षणातच मुलांचा होरपळून मृत्यू झाला. हृदय द्रवून टाकणारी ही घटना सोमवारी ११ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथे घडली. 

 

क्षीरसागर येथील विष्णू मव्हारे यांच्या शेतातील गोठ्याजवळ त्यांचा मुलगा वेदांत मव्हारे (७) त्याची चुलत बहीण संजीवनी गजानन मव्हारे (४) आणि शेजारील सार्थक मारोती कोलते (५) हे तिघे भातुकलीचा खेळ खेळत होते. या वेळी वेदांतचे वडील विष्णू हे शेतात जात असताना वेदांतने त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट केला. परंतु मला काम आहे तू येऊ नको, असे म्हणत विष्णू यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हट्ट धरून बसला. तेव्हा त्यास चॉकलेट देऊन शांत केले आणि तू येथेच खेळ, असे म्हणत मुलांकडे लक्ष दे, असे पत्नीला सांगून विष्णू शेताकडे गेेले. पत्नी आपल्या घरकामात मग्न होती. ही मुले गोठ्याजवळ भातुकलीचा खेळ खेळतानाच आगपेटीशी खेळत होते. त्याचवेळी चारा आणि भुशाच्या गंजीला आग लागली. हे पाहून मुले घाबरली. त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. परंतु वाऱ्यामुळे आगीने गोठ्यातील चारा आणि पऱ्हाटीने पेट घेतला. छपराच्या बाजूने जास्त पेट घेतल्याने पत्रे खाली पडली. अगोदरच भाजलेली मुले पत्रे पडल्याने बाहेर येऊ शकली नाही. विष्णू मव्हारे यांचे घर गावाच्या थोडे बाजूला आहे. जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन असल्याने बालवाडीसह शाळेला अघोषित सुटी होती. त्यामुळे ही मुले घरीच होती. आजूबाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांना धुराचे लोळ येत असल्याचे पाहून त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. भोकरदन येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग विझल्यानंतर तिन्ही बालकांचे मृतदेह दिसले. त्यानंतर मृतदेह भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. 

 

उत्तरीय तपासणीनंतर दुपारी तिघांवर क्षीरसागर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक वैशाली पवार, लक्ष्मण चौधरी, पायघन यांनी भेट देऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास वैशाली पवार करीत आहेत. या घटनेने शोककळा पसरली असून गावात चूलही पेटली नाही. 

 

आजी-आजोबांना नातवंडाचे दु:ख आवरेना 
रामभाऊ मव्हारे या शेतकऱ्यास विष्णू व गजानन ही दोन मुले. गजानन मव्हारे यांना दोन मुली असून मोठी विद्या तर लहानी संजीवनी आहे. विष्णू मव्हारे यांनाही दोन मुले. मोठा शुभम आणि लहाना वेदांत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आजी-आजोबांना दु:ख आवरेनासे झाले. तर सार्थक हा मारुती कोलते यांचा एकुलता एक मुलगा होता. 

 

मुलाचा हट्ट पुरवला असता तर .... 
वेदांत वडिलांसाेबत शेतात येण्यासाठी हट्ट करीत होता परंतु वडिलांना काम असल्यामुळे त्याला चॉकलेट देऊन शांत केले. त्यानंतर ते शेतात निघून गेले. तासाभरानंतर त्यांना मोबाइलवरून माहिती देण्यात आली. तुम्ही लवकर घरी या, तुमचा मुलगा गंभीर भाजला आहे. हे एेकून हातातील काम टाकून विष्णू मव्हारे गोठ्याजवळ आले. पण तोपर्यंत मुलगा मृत झाला होता. त्याला शेतात सोबत नेले असते तर तो वाचला असता, असे म्हणत विष्णू यांनी हंबरडा फोडला. 
 

बातम्या आणखी आहेत...