आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवरा नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू: नदीपात्रात खोदलेल्या खड्ड्यामुळे घडली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - वाळूतस्करांनी नदीपात्रात खोदलेल्या खड्ड्यांनी शनिवारी तीन शाळकरी मुलांचा बळी घेतला. नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या मुलांना खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगत वर आल्यानंतर ते संगमनेरात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या घटनेने मंगळापूर गावावर शोककळा पसरली आहे.


वेदांत विनोद वैराळ (९ वर्षे), समर्थ दीपक वाळे (१०) आणि रोहित चंद्रकांत वैराळ (११ ) अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. हे वृत्त संगमनेरमध्ये पोहोचताच नागरिकांनी कॉटेज रुग्णालयात धाव घेतली.  तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलिस उपअधीक्षक अशोक थाेरात, निरीक्षक अभय परमारही तेथे आले.


शनिवारी शाळेत गेलेली मुले प्रवरा नदीत आंघोळीसाठी अकराच्या सुमारास उतरली होती. नदीकाठी कपडे धूत असलेल्या महिलांनी या मुलांना पाण्यात आंघोळ करताना बघितले. मात्र, काही वेळाने ही मुले दिसेनाशी झाल्याने महिलांनी आरडाआेरडा केला. या मुलांचा पाण्यात शोध घेण्यात आला, मात्र सापडली नाहीत. काही वेळानंतर त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगू लागले.
वाळूतस्करांनी नदीपात्रातील खोदलेल्या खड्ड्यांमुळे या तिघा बालकांचे बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या प्रवरानदीला शेतीसाठीचे दीर्घ आवर्तन सुुरु आहे. नदीपात्रात पाणी असल्याने या खड्ड्यांचा नेमका अंदाज पाण्यात उतरलेल्या लोकांना येत नाही. पालकमंत्री राम शिंदे शनिवारी संगमनेरच्या दुष्काळी दौऱ्यावर असल्याने संपूर्ण प्रशासन त्यांच्याबरोबर होते. दौरा संपून काही वेळ होत नाही तोच ही वार्ता आल्याने अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.दरम्यान, याप्रकरणी जबाबदार दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

 

 

बातम्या आणखी आहेत...