आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या चुलत भावांचा शेततळ्यात बुडून मत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - तालुक्यातील ढवळपुरी येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या चुलत भावांचा गुरुवारी बुडून मत्यू झाला. इस्माईल शब्बीर शेख (२१), नावेद नूरमहंमद शेख (१५) व  मोईन निजाम शेख (१३) अशी त्यांची नावे आहेत. 


दुपारी तीनच्या सुमारास नूरमहंमद शेख हे पाण्याचा टँकर भरण्यासाठी डॉ. तुंभारे यांच्या शेततळ्यावर गेले होते .त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा नावेद आणि इस्माईल व मोईन हे पुतणे होते. तिघेही नुकतेच पोहण्यास शिकले होते. नूरमहमंद टँकर भरून गेल्यावर तिघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले. पोहत असतानाच शेततळ्यात आधारासाठी असणारा दोर तुटला. त्यामुळे तिघांना शेततळ्याबाहेर पडता आले नाही. दमछाक होऊन अखेर तिघेही बुडाले. नूरमहमंद शेख पुन्हा शेततळ्याजवळ पाणी भरण्यासाठी आले तेव्हा मुले बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या तिघांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.


घटनेची माहिती मिळताच ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खोडदे व ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. बुडालेल्या तिघांनाही बाहेर काढून ढवळपुरीत आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांना मत्यूने गाठले होते. नगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा या तिन्ही भावंडांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.