आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या लोकलमध्ये किकी डान्स करणाऱ्या तिघांना तीन दिवस स्थानक स्वच्छतेची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धोकादायक किकी चॅलेंज आता कारपासून रेल्वेगाडीपर्यंत पोहोचले आहे. धावत्या रेल्वेमध्ये किकी चॅलेंजच्या माध्यमातून जिवावर बेतण्यासारखे कृत्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित केल्याचा पालघरातील तीन युवकांना चांगलाच फटका बसला. वसई येथील रेल्वे न्यायालयाने तिघांनाही सलग तीन दिवस येथील रेल्वेस्थानक साफ करण्याची शिक्षा दिली आहे. विशेष म्हणजे या काळात त्यांना जो कुणी भेटेल त्याला किकी चॅलेंज स्वीकारू नका, ते धोकादायक आहे, असे पटवून सांगावे लागेल. 


निशांत शाह (२०), ध्रुव शाह (२३) आणि श्याम शर्मा (२४) या तिघांनी विरार लोकलमध्ये किकी चॅलेंज पूर्ण केला होता. धावत्या गाडीतून उतरत प्लॅटफॉर्मवर डान्स करून पुन्हा गाडीत ते चढले होते. दोन युवक किकी चॅलेंज घेऊन जात होते आणि तिसरा व्हिडिओ बनवत होता. या तरुणांनी फुंचू इंटरटेन्मेंट नावाचे एक यूट्यूब चॅनल बनवले आहे. त्यावर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. व्हिडिओला दीड लाखपेक्षा अधिक लोकांनी पाहिले. व्हिडिओ आणि स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तरुणांना अटक करण्यात आली. कोर्ट म्हणाले की, 'तुम्ही तिघे तरुण आहात, पण चुकीचे काम केले, असे स्टंट करणे धोकादायक ठरू शकते. शिक्षा म्हणून आता लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचे काम करा.' सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत त्यानंतर एका तासाचा ब्रेक घेऊन ३ ते ५ दरम्यान स्वच्छता करावी लागेल. 


जुलैपासून किकी खूप हिट होत आहे. कॅनडातील रॅप गायक ड्रेकने ही संकल्पना आणली. धावत्या कारमधून उतरून डान्स करायचा व पुन्हा धावत्या कारमध्ये बसण्याचा स्टंट सुरू झाला आहे. भारतासह अमेरिका, स्पेन, मलेशिया, यूएईमध्ये पोलिस किकी करणाऱ्यांना पकडत आहे. 


व्हिडिओत किकी करताना एक तरुण दिसत आहे. 
किकी चॅलेंजवर सर्वात पहिले महाराष्ट्राने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. आता या प्रकरणात पहिली शिक्षाही येथेच सुनावण्यात आली. मुंबई रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी अनुप शुक्ला म्हणाले की, 'आम्ही युवकांना किकी न करण्याचा सल्ला देत आहोत. असे धाडस करणाऱ्यांना पकडले जात आहे. सेलिब्रिटींनाही किकी न करण्यास सांगितले आहे.' 

बातम्या आणखी आहेत...