आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाची दाहकता : राज्यात तीन घटनांत दुष्काळाचे ३ बळी, क्रेनचा रॉड तुटून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बीड - पाण्याने भरलेला ड्रम आणताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ड्रम अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. पती गंभीर जखमी आहे. ही घटना तालुक्यातील गुंजाळा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली.
मीनाक्षी अनुरथ घुगे (२८) असे मृत महिलेचे नाव आहे. गावात पाणी नसल्याने मीनाक्षी व अनुरथ घुगे हे दांपत्य शनिवारी सकाळी दुचाकीवरून शेतात पाणी आणण्यासाठी गेले. बोअरमधून पाणी भरून ते दुचाकीवरून ड्रम घेऊन येत होते. वाटेत दुचाकी घसरली. यात ड्रम अंगावर पडून मीनाक्षी गंभीर जखमी झाल्या. तसेच पती अनुरथ यांनाही मार लागला. यात मीनाक्षी घुगे यांचा मृत्यू झाला. पाणीटंचाईचा जिल्ह्यातील हा चौथा बळी आहे. यापूर्वी गेवराई तालुक्यात चकलांबा येथे वृद्धेचा, वडवणी तालुक्यात चिंचाळा येथे बैलगाडी अंगावर पडून दोन भावांचा मृत्यू झाला होता. 

 

क्रेनचा रॉड तुटून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू
सिन्नर -
 विहिरीचे खोदकाम सुरू असताना डुबेरे येथे क्रेनचा रॉड तुटून विहिरीत पडल्याने भारत रामू गुळवे (४८) यांचा मृत्यू झाला. एक जखमी झाला. शनिवारी डुबेरे व पाटोळे शिवार रस्त्यालगत ही घटना घडली.  देवराम ढोली यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम सुरू असताना रामू गुळवे क्रेनच्या साह्याने विहिरीत उतरत असताना अचानक क्रेनचा रॉड तुटला. 

 

निंबोरा येथे शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू
रावेर तालुक्यातील निंबाेरा येथील शेतमजूर मोतीलाल श्रीपत भंगाळे (५८) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. भंगाळे दुपारी एकच्या सुमारास शेतात खत भरण्याचे काम आटोपून घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी आंघोळ केली व कपडे घालत असताना ते अचानक कोसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भर दुपारी कडक उन्हात शेतामध्ये काम केल्याने उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...