आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणात बुडून तिघांचा मृत्यू ; तीन जणांना वाचवण्यात यश, मृतांत ७ वर्षांचा मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पुणे  - सहलीसाठी पुण्यात आलेल्या तिघांचा तळेगाव औद्योगिक वसाहतीनजीक जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. मृतांमध्ये एका सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तिन्ही मृत मुंबईचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अनिल कोंडिबा कोळसे ( ५८, रा. घाटकोपर, मुंबई), प्रीतेश रघुनाथ आगळे (३२,) आणि प्रशील अमोल आढाव (वय ७, रा. वाशी) अशी मृतांची नावे आहेत. धरणात एकूण सहा जण उतरले होते. त्यातील तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. 


वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्टीसाठी गायकवाड यांच्या घरी मुंबईहून पाहुणे आले होते. रविवारी सगळ्यांनी जाधववाडी धरणात फिरायला जाण्याचे ठरवले. गायकवाड कुटुंबीयांसह त्यांची बहीण छाया व तिचे पती अनिल कोळसे, भाची स्मिता आढाव, तिचा मुलगा प्रीतेश आणि रितेश आगळे हे धरणात उतरले. याच वेळी धरणात एनडीआरएफच्या जवानांचा कँप सुरू होता. याच वेळी अनिल कोळसे यांचा पाय घसरून ते खोल पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी इतरांनी प्रयत्न सुरू केले. पण पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हे बाब जवानांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सगळ्यांना बाहेर काढले. पण तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. 


धरण परिसरात फिरू नये
गेल्या काही वर्षांत धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या अनेक तरुण आणि तरुणींचा पोहण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासनाकडून धरण परिसरात फिरू नये, अशी तंबी देऊनही या परिसरात नागरिक फिरण्यासाठी येत असतात. काही दिवसानंतर पावसाळा सुरू होणार असल्याने पर्यटकांनी धरण परिसरात फिरू नये, असे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...