आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक : नाशिक रोड परिसरातील एकलहरा रोडवर असलेल्या संभाजीनगरातील भोर मळा येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाची दाहकता एवढी भयानक होती की, कुटुंबातील सर्वच व्यक्ती गंभीर भाजले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सर्वात प्रथम रविवारी ३ वर्षांचा अथर्व, सोमवारी नम्रता कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी कुटुंबाचे सर्वेसर्वा असलेले नरसिंग कांबळे यांचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
नाशिक रोड परिसरातील एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शनसमोर असलेल्या संभाजीनगरातील भोर मळा येथे नरसिंग कांबळे हे पत्नी, तीन मुलांसह वास्तव्य करत होते. शुक्रवारी त्यांच्या पत्नी नम्रता (वय ४०) या नेहमीप्रमाणे सकाळी गॅस पेटवण्यासाठी गेल्या असता गळतीमुळे गॅसचा स्फोट झाला.
हा स्फोट एवढा भयानक होता की त्यामध्ये संपूर्ण कुटुंब गंभीर भाजले गेले होते. त्यांना त्वरित उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, गंभीररीत्या भाजल्याने रविवारी ३ वर्षांच्या अथर्वाचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच सोमवारी ७०% भाजलेली त्याची आई नम्रता नरसिंग कांबळे (४०) यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या नातलगांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मंगळवारी कुटुंबप्रमुख असलेले नरसिंग रंगनाथ कांबळे (४४) यांचाही मृत्यू झाल्याने फक्त नातलगच नव्हे, तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आता ६ वर्षांचा निखिल नरसिंग कांबळे (६) आणि नेहा नरसिंग कांबळे असून त्यांच्यावरदेखील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या तिघांच्या मृत्यूबाबत पोलिस गॅस कंपनीवर किंवा गॅस एजन्सीधारकाविरोधात गुन्हा दाखल करणार की दुसरी भूमिका घेतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.