आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू आणण्यास नकार दिल्याने तिघांनी नशेत प्रौढाला पेटवले, इंद्रप्रस्थनगरमधील धक्कादायक घटना

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शेकोटीवर बसलेल्याने रागात दुचाकीचे पेट्रोल काढून अंगावर फेकले

जळगाव- शेकोटीवर बसलेले असताना एकाने दारू आणण्यास नकार दिल्याचा राग आल्यानंतर तिघांनी दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून ते प्राैढाच्या अंगावर ओतून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना इंद्रप्रस्थनगरात रविवारी पहाटे दोन वाजता घडली. यात प्राैढ २५ टक्के भाजला गेला. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू अाहेत.


अनिल चोखा सोनवणे (वय ४३, रा. इंद्रप्रस्थनगर, बाैद्ध विहारजवळ) असे जखमी प्राैढाचे नाव आहे. ते वाहनचालकाचे काम करतात. रविवारी मध्यरात्री सोनवणे हे घराबाहेर उभे होते. यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या छोटू सुरवाडे, विकास साबळे व आणखी एक तरुण (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) हे सोनवणेंजवळ आले. आपण शेकोटी करू असे सांगत ते सोनवणेंना दूध फेडरेशन परिसरातील बौद्ध विहाराजवळ घेऊन अाले. या ठिकाणी शेकोटी पेटवल्यानंतर तिघांनी सोबत आणलेल्या दारूच्या बाटल्या काढून सोनवणेंसह चौघांनी मद्यपान केले. काही वेळाने दारू संपली. यानंतर विकास याने सोनवणेंना पुन्हा दारू आणण्यास सांगितले; परंतु थंडी वाजत असल्याने सोनवणे यांनी दारू आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तिघांनी शेजारी असलेल्या दुचाकीतून पेट्रोल काढून सोनवणेंच्या अंगावर ओतले. ते शेकोटीजवळ बसलेले असल्यामुळे प्रचंड भडका होऊन भाजले गेले. या घटनेत सोनवणेंचे डोळे, मान, चेहरा, दोन्ही हात-पाय भाजले गेले. घटनेनंतर तिघांनी तेथून पळ काढला. तर सोनवणे यांना शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रात्रीतून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने ही घटना शहर पोलिसांना कळवली. यानंतर सोनवणे यांनी दिलेल्या जबाबावरून तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

२५ टक्के भाजल्याने प्राैढ खासगी रुग्णालयात दाखल


दूध फेडरेशन हा भाग शहर, तालुका पोलिस ठाण्यापासून मुख्य रस्त्यावर आले. अशा मुख्य रस्त्यावर मध्यरात्री तरुण शेकोटी करून दारू पित बसतात. तरीदेखील पोलिसांकडून त्यांना हटकले जात नाही. नंतर मद्यधुंद तरुणांत वाद होऊन अशा गंभीर घटना घडतात. पोलिसांचे रात्रीच्या गस्तीवर दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारातून समोर आले.

डोळ्यांजवळ झाली गंभीर दुखापत

या घटनेत सोनवणे हे २५ टक्के भाजले गेले आहेत. त्यांच्या डोळ्यांजवळ गंभीर दुखापत झाली आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सोनवणेंची प्रकृती गंभीर आहे. सोनवणे यांचे दोन्ही हात भाजलेले असल्याने िलहिलेल्या फिर्यादीवर ते स्वाक्षरी करू शकले नाही. तसेच हाताच्या बोटांचे ठसेही देता आले नाही. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचे निशाण फिर्यादीवर स्वाक्षरी म्हणून घेतले आहे.

शेकोटीत स्फोट झाल्याची चर्चा

सोनवणेंसह चौघे जण शेकोटीजवळ बसलेले असताना त्यात अचानक स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे; परंतु सोनवणेंनी दिलेल्या जबाबानुसार दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी दुचाकीतून पेट्रोल काढून सोनवणेंच्या अंगावर ओतल्याने ही घटना घडली आहे. स्फोट झाला असता तर चौघे जखमी झाले असते. या घटनेत केवळ सोनवणे जखमी झाले. त्यामुळे स्फोट झालेला नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...