आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध मुद्यांवरुन नरेंद्र मोदींनी विरोधकांना घेतले, दिवसभरात पंतप्रधानांच्या तीन प्रचार सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कलम 370 रद्द केल्यामुळे संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतोय. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या भविष्यासाठी आम्ही निर्णय घेतला. मागील 70 वर्षांपासून कलम 370 मुळे जम्मु-काश्मीरचा विकास खुंटला होता. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात झालेल्या प्रचारसभेत व्यक्त केले. 
"130 कोटी भारतीय नागरिकांमुळे नव्या भारताचा विश्वास जगाला दिसतोय, आत्ताचा भारत हा बदलेला भारत आहे. 21 व्या शतकातला भारत हा निर्भय आहे. सुरक्षा, स्वच्छता आणि वेग या तिन्ही मुद्द्यांवर सरकार काम करतंय. वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस आम्ही सुरु केल्या. पुण्यात मेट्रो सुरु करतो आहोत, पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतो आहोत", असे मोदी म्हणाले.
"गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी आम्ही विशेष काम करत आहोत. पायाभूत सुविधांसाठी येत्या 5 वर्षात 100 लाख कोटींची तरतुद केली जाईल, त्याचा फायदा पुण्यालाही होणार आहे. पुणे ते पंढरपूर महामार्ग उभारला जाणार आहे अशीही घोषणा मोदी यांनी पुण्याच्या भाषणात केली."'इतक्या दिवस छत्रपतींचे संस्कार होते, आता त्यांचे कुटुंब आमच्यासोबत'
सातारा जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज साताऱ्यात सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. कलम 370 वरून सरकारची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, आतापर्यंत शिवाजी महाराजांचे विचार आणि संस्कार आमच्याकडे होते, पण आता त्यांचा संपूर्ण परिवार आमच्याकडे आला आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, काँग्रेसवाले साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानत होते. मात्र, आता इथून त्यांना माघार घ्यावी लागली. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे ते सांगतात. मात्र, इथून खुद्द शरद पवारांनीही उभे राहण्याचे टाळले कारण हवेची दिशा त्यांना चांगली समजते. ते राजकारणातील मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवायला विरोध केला. तसेच साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद आहे, ही बाब खुद्द पृथ्वीराज चव्हाणांनीच एका मुलाखतीत सांगितल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची ही स्थिती आहे, इथे ते एकमेकांना आपली लायकी दाखवत आहेत.
सातारचा दौरा आपल्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील अपशिंगे गावाचा आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, इथल्या अपशिंगे मिल्ट्री गावाने राष्ट्रसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याला राष्ट्रप्रेमाचा आणि त्यागाचा इतिहास आहे. त्यामुळेच जेव्हा राफेल सारख्या आधुनिक लढाऊ विमानांचा विरोधक अपप्रचार करतात, कलम 370 हटवण्याला विरोध करतात, वीर सावरकरांना विरोध करतात तेव्हा साताऱ्याचा पारा चढलेला असतो.
यावेळी साताऱ्याच्या गादीचे कौतुक करताना मोदी म्हणाले, आजवर भाजपाकडे शिवाजी महाराजांचे केवळ संस्कार होते आता त्यांचे कुटुंबीयही आमच्यासोबत आहेत. गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने केंद्रातही आणि राज्यातही शिवाजी महाराजांच्या संस्काराप्रमाणे काम केले. सातारा जिल्ह्याला देशातल्या पहिल्या 15 पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळवून देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.

 

पीएम मोदींनी दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातही कलम 370चा वाचला पाढा

पंकजा मुंडेंसह बीड जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज परळीत सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातही कलम 370चा नारा कायम ठेवला. कलम 370ला विरोध केल्याप्रकरणी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. कलम 370 वरून सरकारची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च करणार


मोदी म्हणाले की, 5 वर्षांत केलेल्या विविध विकास कामामुळे जनता भाजपच्या पाठीशी आहे. मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. यासाठी सरकार 3.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. वॉटर ग्रीडसारख्या विशेष प्रकल्पाद्वारे येथील पाणी प्रश्न सोडवणार आहे. 2022 पर्यंत प्रत्येक घरात नळ पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे मोदी म्हणाले.