आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेलबारी घाटाजवळील पावडदेव फाट्यावर बस कलंडल्याने अपघात, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाल बेनुस्कर

पिंपळनेर- पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील शेलबारी घाटाजवळील पावडदेव फाट्यावर बस कलंडल्याने अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण जखमी झाले आहेत. सततच्या अपघातामुळे हा मार्ग सदैव चर्चेत असतो. 
नाशिकहून पिंपळनेरकडे येणाऱ्या नाशिक-नंदुरबार बस(क्रमांक एम.एच 14 बीटी 1802) या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले व बस जागेवर पलटी झाली. अपघात झाला त्यावेळी रिमझिम पाऊसही सुरू होता. बसमध्ये अनेक प्रवाशी होते. या अपघातात एसटी बसमधील एकाच कुटुंबातील भटू प्रभाकर सोनवणे(वय-35) त्यांची पत्नी अनिता भटू सोनवणे(वय-28) व मुलगी साक्षी भटू सोनवणे(वय-3) (रा.मालांजन ता.साक्री जि.धुळे) हे तिघेजण जखमी झाले आहेत.
 


अपघातानंतर जखमींना तात्काळ पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातास कारणीभूत ठरल्यामुळे बसचालक दिपक काळू गोसावी (रा.नंदुरबार) याच्या विरोधात पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेलबारी घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यामुळे सटाणा रोड, शेलबारी घाट, पावडदेव फाटा, देशशिरवाडे शिवार अपघाताचे क्षेत्र बनले आहे.

मागील काही दिवसंपासून पिंपळनेरसह परिसरात पावसाची संततधार सुरू असून अनेक अपघात वाहने घसरल्याने झाल्याचे दिसून आले आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक फलकांसह सूचना फलक या घाटात बसविणे आवश्यक आहे. शेलबारी घाटात गेल्या 15 दिवसांत अपघाताची पाचवी घटना असून आतापर्यंत एकूण 39 जण जखमी झाले आहेत. या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संपूर्ण भागात वळणदार रस्ता असल्यामुळे समोरून वेगाने येणारे वाहन दिसत नाहीत. याशिवाय या घाटात कोणतेही सूचना फलक नसल्याने  वाहनचालकांना माहिती मिळत नाही. घाटात होणाऱ्या अपघातात सर्वात जास्त अपघात एसटी बसचेच झाले आहेत व पाऊस पडल्यामुळेच झालेले आहेत. त्यामुळे बसचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे