आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकून कुटुंबाला आधार देण्यासाठी आत्महत्याग्रस्त; तीन शेतकऱ्यांच्या विधवांनी दिली दहावीची परीक्षा

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नांदेड : राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सर्वाच्याच चिंतेचा विषय झाला. त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. शासनाने अनेक उपाययोजना करूनही त्यावर प्रतिबंध बसला नाही. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. परंतु अशा निराशेच्या गर्तेतही अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला. आत्महत्या केलेल्या तीन शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी दहावीची परीक्षा देऊन आपणच आता कुटुंबाचा आधार बनणार असा निर्धार व्यक्त केला. 

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असे नेहमी म्हटले जाते. परंतु जेव्हा याच मुलीचा जीवनाचा आधार कोलमडून पडतो तेव्हाही तिचे काही प्रमाणात खच्चीकरण होते. त्यात तरुण वयात मुलांची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, पतीच्या वृद्ध माता-पित्याची जबाबदारी आणि घरातील अठराविश्वे दारिद्र्य ही आव्हाने तिच्यासमोर उभी राहतात. अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील सुनीता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांनी मात्र या संकटावर मात करण्याचा निश्चय केला. जीवनातील संकटांचा मुकाबला करायचा असेल तर  शिक्षण गरजेचे आहे याची जाणीव ठेवत या तिघींनीही बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीच्या परीक्षेचा अर्धापूरला अर्ज भरला. अर्धापूर येथील जि. प. माध्यमिक शाळेतील दहावी परीक्षा केंद्रातून त्यांनी  परीक्षा दिली. 

संकटाला इष्टापत्ती समजूनच दिली परीक्षा

ग्रामीण भागात मुलींची लग्न लवकर होतात. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अजूनही शिक्षणाच्या सोयी नसल्याने शिक्षण घेता येत नाही. परंतु आयुष्यात आलेल्या संकटाला इष्टापत्ती समजून या तिघींनीही मुलांसोबत स्वत:ही दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील भोई प्रतिष्ठानने अर्धापुरात पुण्यजागर प्रकल्प सुरु केला. त्यातून प्रेरणा घेऊन सुनीता कदम, मंगला इंगोले व लक्ष्मी साखरे यांनी आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला.

अायुष्यात खडतर परीक्षा दिल्या

आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर मोठे संकट आले. या संकटात भोई प्रतिष्ठानने सहकार्य केले.  मुलांसोबत आपणही शैक्षणिक प्रवाहात यावे हा निर्धार केला. आयुष्यात अनेक खडतर परीक्षा दिल्या. आता दहावीची परीक्षा देवून कुटुंबाचा आधार बनावे अशी आमची इच्छा आहे. अशा भावना मंगला इंगोले ,सुनीता कदम व लक्ष्मी साखरे यांनी व्यक्त केल्या.

अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

जि. प.चे सीईओ अशोक काकडे यांनी या महिलांचे अभिनंदन केले. पुण्यजागर प्रकल्पाचे डॉ. मिलिंद भोई, अनिल गुंजाळ,  लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर, मुख्याध्यापक डाॅ शेख , रमेश करंजीकर , नागोराव भांगे , छगन इंगळे , सय्यद युनूस ,प्रदिप हिवराळे ,सय्यद जाकेर जमील अहेमद यांनीही शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...