आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यामध्ये तीन भीषण अपघात; चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : देगलूर-नांदेड मार्गावरील खानापूर फाट्याजवळ गुुरुवारी मालवाहू ट्रक बोलेरो पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात १ जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

देगलूर- नांदेड मार्गावर खानापूर फाट्यानजीक असलेल्या झीरो फाट्यावर मालवाहू ट्रक क्रमांक एम. एच.४ जेके ७१२४ हे वाहन हैद्राबादवरून नांदेडकडे जात होते. बोलेरो पिकअप क्रमांक एम. एच. २६ बी. ई. ३४४७ हे वाहन नांदेडवरून देगलूरकडे येत होते तर याच रस्त्यावर ऑटो क्रमांक ८८५४ थांबलेले होते. ट्रक व बोलेरो वाहनाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात बोलेरो चालक माधव धोंडीबा हनमंते राहणार माळकौठा हा जागीच ठार झाला तर मालवाहू ट्रक क्रमांक चालक गजानन गंगाधर डोईफोडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर देगलूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

गोळेगाव पाटीजवळ ट्रेलर-दुचाकी अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू

हिंगोली : औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर गोळेगाव पाटीजवळ भरधाव ट्रेलर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात काका व पुतण्याचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (ता.२३) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारा हा अपघात घडला आहे. या प्रकरणात औंढा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

परभणी जिल्ह्यातील नागनगाव येथील शिवाजी यादव शिंदे (३०), आकाश किशनराव शिंदे (१९), गोपाल किशनराव शिंदे (१४) हे गुरुवारी सकाळी दुचाकी वाहनावर औंढा नागनाथ येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते गावी जाण्यासाठी निघाले होते. या वेळी गोळेगाव पाटीजवळ समोरून भरधाव येणाऱ्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर रस्त्याच्या खाली उतरले तर दुचाकी रस्त्यावरच घासत गेली. या अपघातामध्ये दुचाकीवरील शिवाजी शिंदे व आकाश शिंदे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर गोपाल शिंदे गंभीर जखमी झाला.

चिंचोली माळी येथे पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक

केज : दोघे पती-पत्नी केजहून उत्रेश्वर पिंप्रीकडे जात असताना चिंचोली माळी येथे दुचाकी थांबवल्यानंतर रस्ता आेलांडून महिला लघुशंकेसाठी जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत महिला ठार झाली, तर पतीही ट्रॅक्टरच्या धडकेत जखमी झाला. हा अपघात चिंचोलीमाळी- नांदूरघाट मार्गावर घडला असून अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील बनकारंजा येथील युवराज भाऊसाहेब थोरात (३५ ) व त्यांच्या पत्नी अनिता युवराज थोरात ( ३०) हे दोघे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता दुचाकीवर ( एम. एच. ४४ एफ ४४१४ ) बसून केजहून उत्रेश्वर पिंप्रीकडे निघाले होते. चिंचोलीमाळीपासून काही अंतरावर गेल्यानंतर थोरात यांच्या पत्नीने लघुशंकेला जाण्यासाठी दुचाकी थांबविण्यास सांगितली. रस्ता ओलांडून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने ( एम. एच. २५ एच ३९५२ ) अनिता थोरात यांना जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर याचवेळी ट्रॅक्टरने दुचाकीजवळ थांबलेले युवराज थोरात यांना धक्का दिल्याने तेही किरकोळ जखमी झाले. यात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...