आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेने बुलेटस्वारांचा मृत्यू, तीन मित्रांची एकाच वेळी अंत्ययात्रा; भुसावळच्या महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मित्राच्या बुलेट गाडीची चक्कर मारण्याची हौस भुसावळातील तीन मित्रांच्या जिवावर बेतली. अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा करुण अंत झाला. महामार्गावरील माळी भवनजवळ शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. तिन्ही मित्रांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी २ वाजता एकाच वेळी काढण्यात आली. तिघांवर एकाच वेळी दफनविधी करण्यात आला. 

 

शहरातील शेख वाजिद शेख रफिक(२३, रा. काझी प्लाॅट, भुसावळ), शेख समीर शेख हमीद ( २२, रा. काझीपूर ब्रिजजवळ, भुसावळ) व शेख जावीद शेख माेहिनाेद्दीन (२२, रा. काजी प्लाॅट, भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री त्यांनी मित्र मेमन याची बुलेट (एमएच १९ डीई ९१४६) चक्कर मारण्यासाठी घेतली. महामार्गावर माळी भवनाकडे तिघे बुलेटवर चक्कर मारण्यासाठी गेले हाेते. त्याच वेळी वरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने बुलेटला धडक दिली. तिघांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला. 

 

पोलिसांनी नाहाटा चौफुली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, संबंधित वाहन आढळले नाही. याप्रकरणी शेख जाकीर हुसेन शेख अफजलाेद्दीन (रा. मुस्लिम काॅलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पाेलिसांनी अपघातातील बुलेट ताब्यात घेतली. पाेलिस निरीक्षक देवीदास पवार तपास करत अाहेत. 

 

तिघे करत होते मजुरी 
शेख समीर, शेख वाजिद व जावेद शेख हे तिघे मित्र मजुरी करत होते. समीर वेल्डिंगचे काम करत होता, त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आहे. तर शेख वाजिद हा भावासाेबत रंगकाम करून उदरनिर्वाह करत होता. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. शेख जावेद हा मंडप लावण्याचे तसेच शूटिंगचे काम करत होता. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. जावेदच्या पश्चात पाच भाऊ आहेत. 

 

शवविच्छेदनाला विलंब 
शनिवारी रात्री मित्राच्या घरी लग्न असल्याने तिघे उशिरापर्यंत तेथेच होते. बुलेट चालवण्याचा मोह तिघांसाठी जीवघेणा ठरला. तिघांच्या घराबाहेर शनिवारी रात्रीपासून गर्दी कायम होती. शवविच्छेदनासाठी जळगावला पाठवलेले मृतदेह रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. 
 

बातम्या आणखी आहेत...