आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या हिमतीवर श्रीमंत होणाऱ्या अमेरिकेतील अव्वल ८० महिलांमध्ये तीन भारतवंशीय महिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - बिझनेस मासिक फोर्ब्जने स्वत:च्या हिमतीवर श्रीमंत होणाऱ्या (सेल्फ मेड) अमेरिकेतील अव्वल ८० महिलांची यादी जारी केली आहे. या यादीमध्ये भारतवंशीय तीन महिलांचा समावेश अाहे. कॉम्प्युटर नेटवर्किंग संस्था एरिस्टा नेटवर्क्सच्या सीईओ जयश्री उलाल, आयटी कन्सल्टिंग अँड आउटसोर्सिंग संस्था सिनटेलच्या सहसंस्थापक नीरजा सेठी आणि स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनी कन्फ्लुएंटच्या सहसंस्थापक नेहा नारखेडे या तिघी भारतवंशीय महिला आहेत. या यादीत अव्वल स्थानी डाएन हेनड्रिक्स आहेत. त्या एबीसी सप्लायच्या अध्यक्ष आहेत. डाएन यांचे नेटवर्थ ४९ हजार कोटी रुपये आहे.

 

१० हजार कोटी रुपयांच्या नेटवर्थसह जयश्री उलाल १८ व्या क्रमांकावर

 

जयश्री उलाल : एरिस्टात पाच टक्के भागीदारी 
 

जयश्री उलाल या यादीमध्ये १८ व्या क्रमांकावर आहेत. ५८ वर्षीय जयश्री यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता. त्याचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. जयश्री यांनी करिअरची सुरुवात एएमडीसोबत केली होती. १९९३ मध्ये त्यांनी सिस्को जॉइन केले. तेथील १५ वर्षांच्या कार्यकाळात त्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचल्या होत्या. २००८ मध्ये त्या क्लाउड नेटवर्किंग कंपनी एरिस्टाच्या सीईओ बनल्या. 

 

नेहा नारखेडे : कंपनी नेटफ्लिक्सला देते सेवा
या यादीत असलेल्या भारतीय महिलांमध्ये नेहा नारखेडे या सर्वात कमी वयाच्या आहेत. ३४ वर्षीय नेहा या यादीत ६० व्या क्रमांकावर आहेत. त्यांचे नेटवर्थ २.५ हजार कोटी रुपये आहे. नेहा यांनी २०१४ मध्ये कनफ्लुएंट कंपनीची सुरुवात केली होती. आज या कंपनीच्या गोल्डमॅन साक्स, नेटफ्लिक्स आणि उबेरसारख्या कंपन्या ग्राहक आहेत. नेहा या आधी सोशल नेटवर्किंग साइट लिंक्डइनच्या इंजिनिअर होत्या. लिंक्डइनच्या काही मित्रांसोबतच त्यांनी कनफ्लुएंटची सुरुवात केली होती. 
 

 

नीरजा सेठी : दोन हजार डॉलरपासून केली सुरुवात
नीरजा सेठी या जयश्री उलाल यांच्यानंतर भारतवंशीय दुसरी सर्वात श्रीमंत महिला आहेत. ६४ वर्षीय नीरजा यांनी १९८९ मध्ये पती भरत देसाई यांच्यासोबत मिशिगनच्या ट्राॅयमध्ये सिनटेल कंपनीची सुरुवात केली होती. त्या वेळी त्यांनी केवळ दोन हजार डॉलरच्या गुंतवणुकीतून कंपनी सुरू केली होती. फोर्ब्जनुसार नीरजा यांचे सध्याचे नेटवर्थ १०० कोटी डॉलर (सुमारे ७ हजार कोटी रुपये) आहे. नीरजा या यादीमध्ये २३ व्या क्रमांकावर आहेत.
 

यादीत २१ ते ९२ वर्षीय महिलांचा समावेश
फोर्ब्जच्या ८० महिलांच्या या यादीत २१ ते ९२ वर्षांपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. सर्व ८० महिलांची एकूण मालमत्ता ५.६ लाख कोटींची आहे. यात सर्वात कमी मालमत्ता टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स यांची आहे. त्यांच्याकडे १.६ हजार कोटींची मालमत्ता आहे. ८० पैकी २५ महिलांची मालमत्ता १०० कोटी डॉलर (सुमारे ७ हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या ३८ महिला कॅलिफोर्नियात, तर ९ महिला न्यूयॉर्कमध्ये राहतात. ८० पैकी १९ महिलांचा जन्म अमेरिका बाहेर झालेला आहे.