Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Three looters robbing gold at cheap prices

स्वस्तात सोने देण्याचे अामिष दाखवत लुटणारे तिघे गजाआड

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 11:49 AM IST

मोक्कातील फरार गुन्हेगारही जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 • Three looters robbing gold at cheap prices

  नगर - खोदकाम करताना एक िकलो सोने सापडले असून ते स्वस्तात देतो, असे अामिष दाखवत पाच लाखांची लूट करणारे तीन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. गोविंद काशिनाथ रुजे (३६, सॅण्डविच कॉलनी, दिघी रोड, भोसरी, पुणे) असे लूट झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पकडलेल्या तिघांपैकी एक मोक्कातील फरार आरोपी आहे.


  केदार प्रल्हाद मोहिते (३६, चाळीसगाव, जि. जळगाव, हल्ली नविबेज, ता. कळवण, जि. नाशिक), गौतम हिरामण काळे (४५, पानसवाडी, ता. नेवासे) व अजबे महादू भोसले (२२, गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी रुजे हे झापवाडी शिवारात पाटाच्या पुलाजवळ उभे असताना तोंडओळख असलेली व्यक्ती त्यांच्याजवळ आली. आम्हाला खोदकाम करताना एक किलो सोने सापडले असून ते तुम्हाला स्वस्तात देतो, असे आरोपींनी त्यांना सांगितले. रुजे पाच लाख रुपये घेऊन आल्यानंतर आरोपींनी ते लुटले. ही घटना ९ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली.


  गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी केदार याला कळवण येथे अटक केली. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गौतम व त्याच्या जावयाच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचेही त्याने सांगितले. केदार याच्याच मदतीने त्याच्या साथीदारांना पकडण्याचा सापळा पोलिसांनी रचला. स्वस्तात सोने खरेदी करणारा बनावट ग्राहक बनून गौतम यास सोने घेऊन येण्यास सांगितले. घोडेगाव ते सोनई रस्त्यावरील पाटाच्या कडेच्या रस्त्याने ठरलेल्या ठिकाणी गौतम व त्याचा सहकारी आला. तेथेच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. आरोपी गौतम याच्याविरुध्द औरंगाबाद जिल्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून तो अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागीनाथ पंचमुख, दिनेश मोरे, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, योगेश सातपुते, रोहिदास नवगिरे, सचिन कोळेकर आदींनी ही कारवाई केली.

  सोन्याची बनावट घागर व अंगठ्या हस्तगत
  आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, बनावट सोन्याने भरलेली घागर दाखवत ते अामिष दाखवत. स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या अामिषाने संबंधित ग्राहक पैसे घेऊन ठरलेल्या ठिकाणी आले. पैसे घेऊन येताच आरोपींनी त्याच्याकडून बळजबरीने पैसे काढून घेत पोबारा केला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली घागर व बनावट सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या आहेत.

Trending