आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखेंमुळे नगरमध्ये तीन आमदारांचा पराभव; राम शिंदे यांचा गाैप्यस्फाेट, पंकजा, खडसे यांच्यानंतर भाजपत नवीन वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या नाराजीनाट्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पराभवामागे काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जबाबदार असल्याचा गंभीर आराेप केला. एवढेच नव्हे तर विखे पाटील ज्या पक्षात जातात, तिथे खोड्या करतात आणि त्या पक्षासाठी प्रतिकूल वातावरण तयार करतात, असाही दावा केल्यामुळे भाजपतील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या राेहणी खडसे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू हाेती.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभूत झालेल्या उमेदवारांशी चर्चा करून नेमके कारण काय हे शाेधण्यासाठी सध्या मंथन सुरू आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माजी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे असून त्यांनी शनिवारी उत्तर महाराष्ट्रात पराभूत झालेल्या उमेदवारांशी चर्चा केली. या बैठकीला प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी नेते उपस्थित होते. बैठकीत भाजपच्या तिन्ही अामदारांनी पराभवामागे विखे पाटील असल्याचा सूर व्यक्त केल्याचे समजते. मात्र, राम शिंदे यांनी अधिकृतपणे हल्लाबाेल केला.

भाजपला दोष देणे चुकीचे ?: एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांनी भाजपवर थेट राेष व्यक्त केला. मात्र, राम शिंदे यांनी स्वत:पुरते मत विचारले तर भाजपला दाेष देण्यात अर्थ काय, असा सवाल केला. पक्षाने तीनदा अामदार केले. मंत्रिपदही दिले. त्यामुळे एका विशिष्ट व्यक्तीच्या चुकीचे खापर पक्षावर फाेडणे याेग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने अाता त्यावर काेअर कमिटीच्या बैठकीत विचार करावा, असेही मत त्यांनी मांडले. या बैठकीनंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगली होती.

भाजपच्या तिन्ही आमदारांकडून विखे-पाटील लक्ष्य

राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर सरळ हल्ला केला. नगरमध्ये भाजपचे पाच आमदार होते. विखे पाटील व वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या सात इतकी झाली. भाजपची ताकद नगरमध्ये वाढल्याचे चित्र असताना निवडणुकीनंतर अवघे तीनच आमदार शिल्लक राहिले. नगर बारा विरुद्ध शून्यने जिंकू असा दावा काेठे गेला. विखे पाटील यांच्यामुळे फायदा तर झालाच नाही, मात्र फटका बसल्याचा दावा तिघांनी केला. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात, असे शिंदे यांनी सांगितल्यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी त्यात तथ्य असल्याकडे लक्ष वेधले. विखेंनी एका मतदारसंघात स्वत:च्या मेहुण्याला अपक्ष म्हणून उभं केलं होतं. पण त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याकडे काेल्हे यांनी लक्ष वेधले. मी या दोघांच्या मताशी सहमत आहे, असे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगून ताेफ डागली.

तर भाजप शिवसेनेशी तडजोड करेल : शेलार

नागरिकत्व सुधारणा कायदा हा आवश्यक असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. यामुळे राज्यातील सत्तांतरणावर परिणाम झाला तर राज्यातील सरकार वाचवण्यासाठी भाजप तडजोड करण्यास तयार आहे, अशी खुली ऑफरच शेलार यांनी शिवसेनेला दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...