आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात एकाच रात्रीतून तीन जणांचा खून; नागरिकांत दहशत, पोलिसांनी काही जणांना घेतले ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गेल्या काही दिवसांत राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे गाव असलेल्या नागपुरात गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री तीन वेगवेगळ्या भागात अवघ्या चार तासांच्या कालावधीत तिघांची हत्या झाली. यामध्ये एक भाजी विक्रेता, एक तरुण आणि एका व्यापाऱ्याचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही घटनांचा तपास सुरू केला असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तीन खुनाच्या घटनांनी नागपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

पहिली घटना नंदनवन पोलिस ठाण्यातंर्गत हसनबाग रोडवर घडली. भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे मोहमंद आसिफ शेख यांच्या टपरीवर काही गुंडांनी भाजी खरेदी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिला. त्या वेळी आसिफ आणि त्याचा मित्र इमरान सय्यद नियाज याने भाजीचे पैसे मागितले. मात्र, गुंडांनी पैसे देण्यास नकार देत उलट दोघांना मारहाण केली. त्यानंतर गुडांनी चाकूने भोसकून इम्रानची हत्या करत आसिफ शेखला गंभीर जखमी केले.
नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत सेनापती नगरच्या मैदानात घडलेल्या दुसऱ्या घटनेत विकी डहाके नावाच्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली. या घटनेचे कारण अद्याप समजले नाही. तिसरी घटना बैरामजी टाऊन परिसरातील गोंडवाना चौकात घडली. कुलरचा व्यवसाय करणाऱ्या ऋषी खोसला यांची हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून हत्या केली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋषी खोसला कारने घरी जाताना काही हल्लेखोरांनी कार अडवत ऋषी यांना गाडीबाहेर ओढून काढले. त्यानंतर त्यांची धारधार शस्त्राने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

टोळीयुद्धातून साताऱ्यात गुंडाची हत्या; दोन अटकेत
गुंड पवन दीपक सोळवंडे याची हत्या टोळीयुद्धातून झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहाेचले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून यातील आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी गोळ्या झाडणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली.