आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांसह एक जण ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-नाशिक शहरासह जिल्ह्याला शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. वीज पडून दिंडोरी येथे एका महिलेचा तर इगतपुरीत महिलेसह एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. नाशकात सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या तीन तासांत तब्बल ३४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात निफाड, चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाण्यात पावसाच्या फटक्याने द्राक्ष, सोयाबीन, भात, टोमॅटो, कांदा रोपे आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सटाण्याजवळील पिंगळवाडेत वेडू जिभाऊ भामरे यांचा दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाला आहे. शहरात  दांडियाप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले. दरम्यान, जिल्ह्यात येत्या तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 
 

दिंडोरीतील श्रीरामनगर येथील यमुनाबाई निवृत्ती गांगुर्डे (५५) रस्त्याच्या कडेला शेळ्या चारत असताना वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गांडोळे येथील सुनीता भोये (४५) या शेतात काम करत असताना वीज पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
इगतपुरीत दोन ठार : इगतपुरी  शहरातील तळेगाव तलाव शिवारात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या हिराबाई कारभारी सदगीर (४७) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत  भरत भाऊ भले (४०, रा राहुलनगर, बारशिंगवे) हेदेखील गुरे चरण्यासाठी गेले असता अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १० आॅक्टोबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...