आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड जिल्ह्यात 24 तासांत तीन जणांच्या आत्महत्या; 'त्या' मृतदेहाचे एसआरटीत शवविच्छेदन; ओळख पटेना 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड /केज- मागील २४ तासांत जिल्ह्यात ३ जणांनी विष व गळफास घेऊन आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे. केज, बीड आणि गेवराई तालुक्यात या घटना घडल्या असून संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

 

केज तालुक्यातील एकुरका येथील लोचनाबाई दैवान केदार (५५ ) यांनी पतीच्या आजारपणास व नापिकीला कंटाळून शुक्रवारी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलगा बाळासाहेब केदार यांच्या माहितीवरुन पोलिसांत नोंद करण्यात आली. तर दुसरी घटना गेवराई तालुक्यातील रोहितळ येथे घडली. मोहन भागवत पवार (४६) या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी रात्री ११ वाजता शेतात जाऊन विष प्राशन केले. नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी सुरुवातीला खासगी रुग्णालयात व नंतर रुग्णालयात दाखल केले. 

 

पुण्यात वास्तव्यास असलेल्याचा बीडमध्ये गळफास 
धारूर येथील रहिवासी मात्र गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या रिक्षाचालकाने बीडमध्ये शनिवारी सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. सर्जेराव रामकिसन शिनगारे (३६) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तो मूळचा धारूर शहरातील कसवा विभागातील रहिवासी असून काही वर्षांपासून पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्यास होता. रिक्षा चालवून तो उदरनिर्वाह भागवत होता. शनिवारी पहाटे ४ वाजता तो पुण्याहून बीडकडे निघाला होता. शनिवारी सायंकाळी बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरात पानपनेश्वर मंदिराच्या मागे झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. पोलिस कर्मचारी देविदास आवारे, दादासाहेब उबाळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. 

 

चिठ्ठी सापडली, पोलिसांवर आरोप? 
दरम्यान, मृत सर्जेराव यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. रिक्षाला पुणे पोलिसांनी केलेल्या दंडामुळे त्यांनी आत्महत्या केल्याबाबत चिठ्ठीत उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. 

 

'त्या' मृतदेहाचे एसआरटीत शवविच्छेदन; ओळख पटेना 
तालुक्यातील खडकत येथे जामखेड-माही जळगाव रस्त्यावर खून करून व्यक्तीचा मृतदेह पोत्यातून टाकलेल्या अवस्थेत शुक्रवारी आढळला होता. अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह ओळख पटेपर्यंत शीतगृहात ठेवला आहे. जबर मार असल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक गोडसे यांनी दिली. या प्रकरणी आष्टी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला. ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पीएसआय गोडसे यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...