आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे तीन टक्के शिशूंना जन्मजात व्यंग, 5 रुपयांच्या गाेळ्यांनी टळतो धोका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विवाहित महिलेसाठी फॉलिक अॅसिड म्हणजे व्हिटॅमिन बीच्या गोळ्या आवश्यक आहे. या गोळीला वेडिंग पिल असेही म्हणतात. गर्भवती महिलांमध्ये यांच्या कमतरतेमुळे बाळाला गंभीर स्वरूपाचा व्यंग होण्याची शक्यता असते. सरकारी रुग्णालयात विनामूल्य तर खासगी दुकानात अवघ्या ५ रुपयात मिळणाऱ्या या गोळीमुळे हा धोका टळताे. यापूर्वी आयर्न आणि फॉलिक अॅसिडची गोळी एकत्र येत होती. परंतु, शासनाने पहिल्यांदाच फाॅलिकची गोळी स्वतंत्र केली आहे. यामुळे होणारे साइड इफेक्ट टळले आहेत. 

 

आई हाेतांना शरीरात मोठे बदल होतात. बाळ आणि आईसाठी फॉलिक अॅसिडचा डोस घेणे आवश्यक असते. पालेभाज्या आणि डेअरीच्या पदार्थातून फॉलिक अॅसिड मिळते. महिला गर्भवती असल्यास गरज वाढते. मात्र,अज्ञानामुळे महिला गोळीचे सेवन करत नाही. त्यामुळे त्रास बळावतो. यामुळेच शासनाच्या वतीने ८ ते १४ जानेवारी दरम्यान फॉलिक अॅसिड जागृती सप्ताहाचे आयोजन केले जाते. 

 

पाच रुपयात १० गोळ्या 
आतापर्यंत शासकीय स्तरावर आयर्न आणि फॉलिक अॅसिडची गोळी एकत्र येत होती. आयर्नमुळे महिलांना मळमळ व उलट्या येण्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे ही गोळी स्वतंत्र तयार केली आहे. शासकीय रुग्णालयात ही गोळी विनामूल्य मिळते. बाजारात ५ रुपयात १० गोळ्या उपलब्ध आहेत. गर्भधारणा होण्याआधी किंवा झाल्यावर शरीरात पुरेशा प्रमाणात फॉलिक अॅसिड असणे आवश्यक आहे. महिलेला प्रतिदिवस ४०० मिलीग्रॅमची गरज भासते. सध्या ५ मिलीग्रॅमच्या गोळ्या आहेत. यातून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात फॉलिक अॅसिड शरीरात जाते. विवाहानंतर ही गोळी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फॉलिक अॅसिडची कमी पूर्ण केली पाहिजे. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले. 

 

जन्मजात व्यंगाचा धोका 
हायपर होमोसिस्टेनिया प्रकारात फॉलिक अॅसिड अभावी एंडोथेरियल सेलवर दुष्परिणाम होतो. यामुळे दोन प्रकारचे धोके निर्माण होतात. पहिल्या प्रकारात मेंदूभोवताली कवटी तयार होत नाही. अशा परिस्थितीत बाळ १०० टक्के दगावते. दुसऱ्या प्रकारात मेंदूतून मणका बाहेर येतो. शस्त्रक्रिया करून ते नीट करता येते. पण बाळाला कायमचे अपंगत्व येते. बाळाला हृदयरोग, किडनी आणि लिव्हरचे आजार बळावण्याचा धोका असतो. साधारपणे ३ टक्के बालके व्यंगासह जन्माला येतात. 
 

बातम्या आणखी आहेत...