आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असताना औरंगाबादेत 3 जणांनी ध्वजारोहण कार्यक्रमातच आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. तर मराठा आरक्षणासाठी क्रांती चौकात उपोषणास बसलेल्या पांडुरंग पाटील यांनी बुधवारी स्वातंत्र्य दिनी समाधी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र मंगळवारी संध्याकाळी विभागीय आयुक्तांनी त्यांची समजूत घातल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज (बुधवारी) ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दीपक सावंत यांचे आगमन होताच बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील सरपंच सुरेखा दाभाडे आणि त्यांचे पती मुकुंद दाभाडे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून घेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले. तर दुस-या घटनेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान मारे यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनाही पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले. या तिघांनीही आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस त्यांची चौकशी करत आहे.
पांडुरंग पाटलांनी समाधीचा निर्णय घेतला मागे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पांडुरंग पाटील गत 27 दिवसांपासून शिवध्वज हाती घेऊन क्रांती चौकात उपोषण करत आहेत. मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी 15 ऑगस्ट रोजी क्रांती चौकात समाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला होता. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आयुक्त व विभागीय आयुक्त यांनी ठोस आश्वासन देईपर्यंत निर्णय बदलणार नाही, अशी भूमिका पाटील यांनी घेतली होती. त्याची दखल घेत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वर्षा ठाकूर यांनी पाटील यांच्याशी मंगळवारी संध्याकाळी अर्धा तास चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेचे पत्र डॉ. शिवानंद भानुसे यांनी सर्वांना वाचवून दाखवले. यानंतर पाटील यांनी समाधीचा निर्णय मागे घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.