अकोला / जुन्या स्कुटरपासून बनवण्यात आले टिकावू डवरणी यंत्र; अल्पभूधारकांसाठी फायद्याचे

आखतवाड्यातील 'थ्री इडियट्स'चा शेतीउपयोगी प्रयोग, बैेलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांना मिळणार माेठा दिलासा 
 

दिव्य मराठी

Jul 26,2019 10:51:00 AM IST

अकोला - तंत्रशिक्षणाला कल्पनेची जोड नि नवनिर्मितीची हौस असली की हात रिकामे राहत नाहीत. हेच अकोला तालुक्यातील आखतवाडा येथील आयटीआय झालेल्या युवकांनी दाखवून दिले आहे. टाकाऊ स्कूटरचे पार्ट वापरून या युवकांनी डवरणी यंत्र तयार केले आहे. एक लिटर पेट्रोल मध्ये तासभर चालणारे हे डवरणी यंत्र सफाईदार आंतरमशागत करीत असल्याने हे यंत्र सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.


सचिन दुर्गे, युवराज भोपसे आणि विशाल इंगोले हे आखतवाडा गावातील 'थ्री इडियट्स'. गावातील विजय तालोट यांच्या शेतात असलेला गोडाऊनला त्यांनी आपली प्रयोगशाळा केली. येथे टाकाऊ वस्तूंपासून शेतीउपयोगी विविध यंत्रे तयार करण्याचे काम हे तिघे करतात. दोन वर्षांपूर्वी दर्यापूर आयटीआयमध्ये सचिन आणि युवराज यांनी वेल्डरचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यात खाजगी कंपनीत कामही केले.


कंपनीचा कंत्राट संपल्यानंतर गावी परतून त्यांनी शेतीउपयोगी यंत्र-निर्मितीस सुरूवात केली. यंदा त्यांनी टाकाऊ स्कुटर दोन हजार रुपयांमध्ये विकत घेऊन त्याच्या उपयोगी पार्टचा लोखंडी चेचीसवर वापर करून डवरणी यंत्र तयार केले. यासाठी स्कूटरसह सुमारे पाच हजार रुपयांचा खर्च आला असून हे यंत्र सध्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


अल्पभूधारकांसाठी फायद्याचे
गेल्या पाच वर्षांपासून निर्माण होणाऱ्या चारा-पाण्याच्या प्रश्नामुळे अनेकांनी बैल विकले आहेत. जिल्ह्यातही चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे बैल पाळणे खर्चिक झाले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी हे डवरणी यंत्र उपयोगी पडू शकते, असे या युवकांचे म्हणणे आहे.


पीक रक्षक यंत्र :

या युवकांनी गेल्या वर्षी टाकाऊ वस्तूपासून पिक रक्षण स्वयंचलित वाद्याची निर्मिती केली आहे. हवेवर फिरणाऱ्या भिंगरीव्दारे वाद्याचा आवाज होऊन पिकावर पाखरं किंवा वन्यजीव येऊ नये. यासाठी तयार केलेल्या या यंत्रालाही शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.


१५० सीसी क्षमतेचे इंजिन :

डवरणी यंत्र तयार करण्यासाठी जुन्या स्कूटरचे १५० सीसी क्षमतेचे इंजिन, रेस, गियर, क्लच आणि तंत्रांचा वापर करण्यात आला. त्यासाठी या कारागिरांनी यूट्यूबवरील विविध व्हिडीओंचा आधार घेतला आहे. शेतकऱ्यांनी कमी खर्चात उपयोगी यंत्रे तयार करून देणे हा उद्देश आहे.

X