आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three Terrorists Were Killed In Clashes In Ramban, One Soldier Martyred And Two Policemen Injured

काश्मीरमध्ये नवरात्रापूर्वी तीन ठिकाणी हल्ले; ४ अतिरेकी ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर जवानांनी असा विजयोत्सव साजरा केला. - Divya Marathi
अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर जवानांनी असा विजयोत्सव साजरा केला.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या ५४ दिवसांनंतर शनिवारी अतिरेक्यांनी तीन हल्ले केले. मात्र, सुरक्षा दलांनी हे हल्ले परतवून लावले. नवरात्राच्या पूर्वसंध्येला काश्मीरच्या रामबन, श्रीनगर आणि गांदरबलमध्ये अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला, तर रामबनमध्ये भाजपचे बूथ अध्यक्ष विजयकुमार वर्मा यांच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालून सुरक्षा दलांनी वर्मा कुटुंबीयांची सुटका केली. या कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर पोलिस दलातील दोन जवान जखमी झाले आहेत.

दुसरी चकमक गांदरबलमध्ये झाली. येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी एका अतिरेक्याला गोळ्या घातल्या. तिसरा हल्ला श्रीनगरमध्ये झाला. येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकले. यात कुणीही जखमी वा मृत झाले नाही. हे अतिरेकी पळून गेले. या अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. 
 

विजयोत्सव : दहशतवादाचा नायनाट करणारे शूर सैनिक

डोभाल काश्मीर दौऱ्यावर, सर्व भागांतून निर्बंध हटवले : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काश्मीर दौऱ्यावर असून सुरक्षा आढावा बैठकीनंतर सर्व १०५ ठाण्यांच्या हद्दीतून निर्बंध हटवण्यात आले आहेत. 

शाळा अजूनही बंद, फक्त शिक्षक-कर्मचारीच हजर : १९ ऑगस्टला शाळा सुरू झाल्या. ७० टक्के शाळा उघडल्या. मात्र, सध्या तेथे शिक्षक व कर्मचारीच येतात. विद्यार्थी अजूनही येत नाहीत. खासगी शाळा तर बंदच आहेत. 
 

प्रत्युत्तर | अतिरेक्यांना पेन्शन देणाऱ्यांनी शांततेविषयी सांगू नये
यूएन महासभेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण भारताविषयी घृणा प्रकट करणारे असल्याचे सांगून भारतीय मिशनच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा म्हणाल्या, अतिरेक्यांना पेन्शन देणाऱ्या पाकने शांततेविषयी शिकवू नये.
 

पाकच्या दाव्यावर उपस्थित केले प्रश्न 

पाकिस्तानात अतिरेकी संघटना नाहीत हे पाहण्यासाठी इम्रान यांनी यूएन पर्यवेक्षकांना बोलावले आहे. यावर मैत्रा यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
 
>  संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेले १३० दहशतवादी व २५ अतिरेकी संघटना पाकमध्ये नाहीत काय ?
> संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेल्या अतिरेक्यांना पेन्शन देणारा पाकिस्तान हा एकमेव देश नाही का ?
> न्यूयॉर्कमधील पाकची प्रतिष्ठित हबीब बँक बंद का आहे? बँकेला टेरर फंडिंगसाठी दंड ठोठावला होता.
> एफएटीएफने २७ पैकी २० निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकला नोटीस दिली नव्हती? न्यूयॉर्कमध्ये ओसामा बिन लादेनचा बचाव कुणी केला होता?