आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील टी वन उर्फ अवनी या कथित नरभक्षक वाघीणीला ठार मारल्यामुळे भाजपच्या नेत्या, केंद्रीयमंत्री मनेका गांधी प्रचंड संतापल्या आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर त्यांनी आपला राग काढला असून त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करणारे निवेदन त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे. अवनीसह तीन वाघ, डझनभर बिबटे आणि ३०० रानडुकरांना या मंत्र्यांच्याच आदेशान्वये ठार मारण्यात आले असून असा माणूस अजून मंत्रिपदी कसा राहू शकतो, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांच्या खात्याचे नाव अवैध शिकारी मंत्री असे ठेवले पाहिजे, असे ट्वीट युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले.
अवनीला ठार करण्यात आल्याची बातमी आल्यानंतर वन्यप्राणी प्रेमी मनेका गांधी यांचा तीळपापड झाला आहे. त्या अनुशंगाने त्यांचे एक निवेदन माध्यमांकडे आले असून त्यात त्यांनी मुनगंटीवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा आणि जनभरातील वन्यप्राणी प्रेमींचा विरोध असतानाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी या वाघीणीला मारण्याचे निर्देश दिले. हे एक मजबूत गुन्हेगारीचे प्रकरण आहे, असेही मनेका गांधी यंानी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
- अवनी वाघिणीला ठार मारण्याचा प्रकार हा गुन्हेगारी आणि राजकीय कृतीचा आहे. प्राण्यांबद्दल असा दृष्टिकोन बाळगणे चुकीचे व निंदनीय आहे. या बेकायदेशीर आणि अमानवी कृतीसाठी एखाद्या व्यक्तीची सेवा राज्य सरकारने का घ्यावी हे समजायला मार्ग नाही. हा गुन्हेगारीचाच
प्रकार आहे.
- वारंवार विनंती करूनही वनमंत्र्यांनी व वन विभागाने वाघिणीला ठार मारण्याचे आदेश का दिले?
- विदर्भात सातत्याने वाघ मारले जात आहेत. ही अशा स्वरूपाची तिसरी घटना आहे.
- प्रत्येक वेळी हैदराबादचा शफात अली खान या शूटरची मदत घेतली जात आहे. या वेळी तर त्याचा मुलगाही माेहिमेत सहभागी हाेता. ताे अधिकृत शिकारीही नाही.
जीव वाचवण्यासाठी तडकाफडकी निर्णय
- आम्हाला गावकऱ्यांच्या तसेच वन कर्मचाऱ्यांच्या जिवाचीही चिंता होती. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे हा निर्णय घेतला. परिस्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घ्यावा लागला. वाघिणीने वन कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्वरित निर्णय घेणे भाग होते.
सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.