आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिवार माघार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकअगदी तीन-चार दिवसांपूर्वीच मला आलेला अनुभव आहे. पण हा अनुभव खूप काही शिकवून गेला. आमच्या वकील मित्राच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने मी त्यांच्याकडे जात होतो. मित्राचे घर नक्की कोणते ते मी विसरलो म्हणून शेजारी चौकशीसाठी एका बंगल्याचे गेटवरील बटण दाबले. तिकडून आवाज आला, ‘कोण पाहिजे?’ आवाज नेमका कोठून येतोय ते लक्षात येईना. तितक्यात एक मध्यवयीन बाई आल्या व म्हणाल्या, ‘कोण पाहिजे?’ मी त्या मित्राचे नाव सांगितले. त्याबरोबर त्या कडाडल्या, ‘सकाळी दहाची वेळ म्हणजे प्रचंड घाईची, त्यात तुमचा हा त्रास! तुम्हाला काही मॅनर्स वगैरे ठाऊक आहेत काय? युसलेस! बेशरम!!’ मी तर अवाक् झालो.

त्या बंगल्यातील मोठे कुत्रे जरी अंगावर आले असते तरी मी एवढा घाबरलो नसतो. मी त्यांना खालच्या आवाजात विचारले, एवढे रागावयाचे कारण नाही, तुम्हाला माहीत नाही तर तसे सांगा. यामुळे तर त्या प्रचंड गरम झाल्या. घरातील मोलकरणीला बोलावले. गॅस बंद करायला सांगितला. त्या बाईंचा आविर्भाव पाहून मला तर असे वाटले की त्या आता आपणास मारणार! त्यांची क्षमा मागून, किमान चार वेळा तरी चुकलो असे म्हणालो. न जाणो त्यांनी फोन करून पोलिसांना कळवले तर मला तुरुंगाची हवा मिळेल, असे वाटले. मी दुसरीकडे चौकशीसाठी निघालो असता, त्यांनी दारासमोर लावलेली स्कूटर काढण्याचे फर्मावले. असा कोणताही आगाऊपणा मी केला नव्हता. सौजन्याने पत्ता विचारण्यासाठी बंगल्याच्या गेटवरची बेल दाबणे गैर नव्हते. सकाळी दहा वाजण्याची वेळ होती. चोरट्यासारखी माझी कृती नव्हती, तरीही त्या बाईंनी माझा असा भयंकर पाणउतारा का करावा? महिलांना अधिक अधिकार असण्याचा हा परिणाम असावा का? मी स्वत: वकील असूनही झंझट वाढवणे नको म्हणून सर्व विसरून जाणे पसंत केले.