आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महातापराष्ट्र : उष्माघाताचे तीन बळी; हिंगोली जिल्ह्यात दोन तर बीड जिल्ह्यात एकाचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - राज्यात उष्णतेची लाट कायम अाहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त आहे. शनिवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातील स‌र्व जिल्ह्यांत पारा ४० अंशांवर होता. राज्यात २९ मेपर्यंत उष्णतेची लाट राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पुणे वेधशाळेनुसार २९ मे रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 


राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत १५ मेपासून सातत्याने तापमान ४० अंशांवर राहिले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २६ ते २९ मे या काळात उष्णतेची लाट राहील.  राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी २९ ते ३१ मेपर्यंत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासही वादळी पावसाची शक्यता आहे.

 

हिंगोली जिल्ह्यात उष्माघातानेे दोन, बीड जिल्ह्यात एकाचा मृत्यू

शनिवारी हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताने दोन बळी घेतले. वसमत तालुक्यातील सेलू येथील साहस रमेश शेलूकर (२२) हा तरुण उन्हात फिरून घरी आला. पाणी पिऊन तो बसला असता त्याला चक्कर आली आणि त्यातच तो दगावला. कुरुंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे सांगितले.  दुसऱ्या घटनेत औंढा तालुक्यातील सोनवाडी शिवारात पिंपळदरी- पांग्रा शिंदे रोडवर एका ५० वर्षीय अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले. उष्माघाताने या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळमनुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.  विटा (जि. बीड) येथील शेतकरी रामकीशन विठ्ठल सावंत यांचाही उष्माघाताने मृत्यू झाला.
 

 

मान्सून अंदमानात पुढे सरकला : नैऋत्य मान्सून १८ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता. त्यानंतर २४ मेपर्यंत मान्सूनने काहीच प्रगती केली नव्हती. २५ मे रोजी मान्सून आग्नेय बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान बेटापर्यंते सरकला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून उत्तर अंदमान बेटापर्यंत येण्यास अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 
 

राज्यातील प्रमुख शहरांचे शनिवारचे तापमान 
अकोला     ४३.८, 
अमरावती     ४३.६
औरंगाबाद     ४०.८
बीड     ४३.२
बुलडाणा     ४१.३
चंद्रपूर     ४६.८
जळगाव     ४३.०
नागपूर     ४६.३
नांदेड     ४४.२
नाशिक     ३७.९
उस्मानाबाद ४२.३
परभणी     ४५.१
सोलापूर     ४३.२
यवतमाळ     ४४.५