डेंग्यू / सिल्लोड : डेंग्यूसदृश आजाराने वडाळ्यातील तिघींचा मृत्यू

डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने अनेक रुग्ण 6-7 दिवसांपूर्वी तापाने फणफणले

Sep 16,2019 10:50:00 AM IST

सिल्लोड - डेंग्यूसदृश आजाराने तिघींचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथे घडली. डेंग्यूची लागण झालेल्या महिलांवर घाटीत उपचार सुरू असताना एका महिलेचा शनिवारी सकाळी, तर दुसऱ्या महिलेचा रात्री आठ वाजेच्या सुमारास, तिसऱ्या मुलीचा रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रुख्मणबाई शेळके (२२), कडुबाई मानकर (६५), साक्षी शेळके (१४) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे अाहेत.


वडाळा गावात डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने अनेक रुग्ण सहा ते सात दिवसांपूर्वी तापाने फणफणले होते. आमठाणा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आजाराची माहिती दिल्याने तेथील आरोग्य पथकाने रुग्णांवर उपचार केले. दोन-तीन दिवसांनी परत येऊ, असे सांगून पथक परत गेले. उपचारानंतर ही तापाची लागण वाढतच गेली. परत गेलेले आरोग्य पथक तपासणीसाठी पुन्हा आलेच नाही. त्यामुळे आजारी दोन महिलांना उपचारांसाठी तीन दिवसांपूर्वी घाटीत दाखल केले होते. रुख्मणबाई शेळके यांचा शनिवारी सकाळी तर कडुबाई मानकर यांचा रात्री आठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. साक्षी शेळके (१९) चा रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला.


गाजर गवत अन् गटारी तुंबल्याचे दिसले
आरोग्य केंद्राच्या पथकाने गावात जाऊन रुग्णांवर उपचार केले. गावाशेजारी गाजर गवत,गटार तुंबल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. ग्रामपंचायत कार्यालयाला परिसर स्वच्छ करण्याचे लेखी पत्रही दिले होते. - डॉ. योगेश राठोड, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, आमठाणा

X