आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडला नगिना घाटावरून तीन कामगार गेले वाहून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. तथापि तामसा येथे शशिकांत प्रकाश कोडगिरवार (२३) हा युवक विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. शहरातील नगिना घाट भागात तीन कामगार गोदावरी नदीत वाहून गेले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीवर दु:खाची छाया पसरली.

शहरातील नगिना घाट गुरुद्वाराच्या भागात सध्या बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी उत्तर प्रदेशातील आझमगढ येथून कामगार कामाला आले आहेत. विसर्जनामुळे गुरुवारी बांधकाम मजुरांना सुटी होती. त्यामुळे अरविंद हरगुन निशाद (१९), रामनिवास विद्याचंद निशाद (२०) व धर्मेंद्र रमेश निशाद (१७) हे तिघे जण गोदावरी नदीत नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावरुन पाणी पाहत होते. नेमके त्याचवेळी पाण्याची आवक वाढल्याने विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत गेली. पाणी वाढत असल्याचे या तिघांच्याही लक्षात आले नाही. पाण्याची पातळी आणखी वाढली असता हे तिघेही तोल गेल्याने घसरुन गोदावरीच्या पात्रात पडले. नगिना घाटावर श्री गणेश विसर्जनाची धामधूम असल्याने या तिघांकडेही कोणाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे ते वाहून गेल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. ते तिघे उत्तर प्रदेशातील असल्याने आणि कोणाच्या ओळखीचे नसल्याने त्याची फार चर्चाही झाली नाही. विसर्जनाच्या दरम्यान तीन जण वाहून गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. परंतु पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, आपत्ती नियंत्रण कक्ष यापैकी कोणीही या घटनेला दुजोरा दिला नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तीन जण वाहून गेल्याचे खरे आहे की, अफवा आहे. याच संभ्रमात सर्वजण होते. सायंकाळी जिल्हा प्रशासनाचा हवाला देऊन सोशल मीडियावर ही अफवा असल्याचेही सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी मात्र हे तिघे जण वाहून गेल्याची फिर्याद ठेकेदार नदी मिस्त्री यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी या घटनेला दुजोरा दिला. दरम्यान, या तिघांचा अद्यापही काही ठावठिकाणा लागला नाही. विष्णुपुरीचा एक दरवाजा उघडल्याने नदीपात्रात गुरुवारी पाण्याचा प्रवाह होता. त्यामुळे ते पुढे वाहून गेले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तामसा येथे विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान शशिकांत प्रकाश कोडगिरवार (२३) हा युवक खदानीसाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो खोल पाण्यात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या दोन घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. कोठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.

बातम्या आणखी आहेत...