आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीला जमिनीवर आपटून ठार मारले; पित्याला जन्मठेप, हिंगोली जिल्हा न्यायालयाचा निकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे तीन वर्षांच्या मुलीचा जमिनीवर आपटून खून करणाऱ्या पित्याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एन. बी. शिंदे यांनी बुधवारी (ता.२२) दिला आहे.

याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील रेणुकाबाई विश्वनाथ पांढरे यांना १० जानेवारी २०१७ रोजी रात्री साडेअकरा वाजता खर्चासाठी पैसे का देत नाही या कारणावरून विश्वनाथ पांढरे याने मारहाण केली. तसेच त्याची मुलगी ईश्वरी विश्वनाथ पांढरे (३) हिच्या पायाला धरून जमिनीवर आपटले. यामध्ये तिच्या डोक्याला दुखापत होऊन ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी वाशीम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच ११ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रेणुकाबाई पांढरे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात विश्वनाथ कुंडलिक पांढरे याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. एन. चिलांगे यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

जिल्हा न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासले

या प्रकरणात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विश्वनाथ पांढरे यास मुलीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी काम पाहिले.
 

बातम्या आणखी आहेत...