water express / तीन वर्षांनंतर ‘रेल्वे’ने पाठवले वॉटर ट्रेनचे दहा कोटींचे बिल, नोटिशीमुळे लातूर मनपाचे पदाधिकारी चक्रावले

२५ कोटी ९५ लाख लिटर रेल्वेद्वारे मिळालेले पाणी, ११ कोटी ८० लाख ८८ हजार ६२५ रुपये रेल्वेचे एकूण बिल 

Sep 05,2019 08:12:00 AM IST

लातूर - तहानलेल्या लातूरला रेल्वेने पाणी पाठवल्याचे तब्बल दहा कोटींचे बिल तीन वर्षांनंतर लातूर महापालिकेला पाठवण्यात आले आहे. यामुळे मनपाचे कारभारी अस्वस्थ आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेने सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम केल्याचे सांगत मनपा किंवा राज्य सरकारकडून कसलेही बिल घेणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र ते आता केंद्रात कोणत्याही मंत्रिपदावर नसल्याचे पाहून हे बिल पाठवण्याचे धाडस रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.


तीन वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोटा (राजस्थान) येथील डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकची स्वच्छता करवून घेऊन ती गाडी पाण्यासाठी लातूरला पाठवली. राज्य सरकारने मिरज (जि. सांगली) येथील रेल्वेस्थानकाशेजारी असलेल्या विहिरीतून पाणी उपसा करून ते लातूरला पुरवठा केले. लातूर मनपाने हे पाणी टँकरद्वारे शहरातील नागरिकांना पुरवले. त्या वेळी या पाण्याचा खर्च किती येईल, तो कोण करेल अशी चर्चा होऊ लागल्यानंतर सुरेश प्रभू यांनी रेल्वेने सामाजिक जबाबदारीतून हे काम केल्याचे सांगत रेल्वे कोणतेही बिल घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी प्रभूंचे खाते बदलण्यात आले. नंतर ते केंद्रात वाणिज्यमंत्री असल्याने त्यांचा निर्णय डावलण्याचे धाडस अधिकाऱ्यांना झाले नाही. परंतु तीन महिन्यांनी झालेल्या निवडणुकीनंतर मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात प्रभूंचा समावेश झाला नाही. त्यामुळे रेल्वेच्या सोलापूर विभागातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ९ कोटी ९० लाख ३० हजार ५१८ रुपयांचे बिल पाठवले आहे. त्यांनी ते लातूर मनपाकडे पाठवले आहे. याही वर्षी पाणीटंचाईचे संकट घोंघावत अाहे. त्यात काय मार्ग काढायचा, पुन्हा रेल्वे मागवायची का अशी चर्चा सुरू असतानाच रेल्वेने बिल पाठवले आहे. महापौर सुरेश पवार, आयुक्त एम. डी. सिंह यांनी राज्य सरकारमार्फत हे बिल माफ करवून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

आकडे बोलतात
> २५ कोटी ९५ लाख लिटर रेल्वेद्वारे मिळालेले पाणी
> ११ कोटी ८० लाख ८८ हजार ६२५ रुपये रेल्वेचे एकूण बिल
> १ कोटी ८७ लाख ७६ हजार ३०० रुपये बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सने रेल्वेला दिले
> २ लाख ८९हजार ६३४ रुपये एका अज्ञात संस्थेने रेल्वेकडे भरले
> ९ कोटी ९० लाख ३० हजार ५१८ रुपये शिल्लक राहिलेल्या बिलाची मनपाला नोटीस

X