आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज न घेताच ५० मीटरपर्यंत धोकादायक रेषा आखली; घटनेवेळी बॅरिकेड्स नसल्याने तिघे बुडाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- दोन अग्निशमन दलाच्या गाड्या, सहा सीसीटीव्हींची नजर, सात लाइफ गार्ड, अकराशे पोलिसांचा बंदोबस्त असतानाही ४. ३० ते ६ वाजेच्या दीड तासाच्या काळात तीन गणेश भक्तांचा मोती तलावात बुडून मृत्यू झाल्याने जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 


पहिल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडून बॅरिकेड्स लावले. नंतर दोघेजण खोल पाण्यात बुडाल्यानंतर पोलिस केवळ हातवारे तर लाइफ गार्ड खोल पाण्याकडे न गेल्याने भक्तांनीच वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतरही अॅम्ब्युलन्सअभावी एकास खासगी रिक्षाने उपचारासाठी न्यावे लागले. यामुळे आक्रमक झालेल्या नातेवाइकांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी १२. ३० वाजता मृतदेह ताब्यात घेऊन दोन मृतदेह थेट नगरपालिकेसमोर ठेवून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. अमोल संतोष रणमुळे (१६, लक्ष्मीनारायणपुरा, जालना), निहाल खुशाल चौधरी (२६), शेखर मधुकर भदनेकर (२०, संभाजीनगर, जालना) अशी मृतांची नावे आहेत. 


रविवारी सकाळपासूनच गणेश विसर्जनाची धामधूम सुरु होती. दुपारपासूनच गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील चारही बाजूंनी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोती तलावातच विसर्जन होत असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु पालिका प्रशासनाने पाहिजे तेवढी तयारी केली नव्हती. तसेच पोलिस प्रशासनानेही गांभीर्याने न घेतले नव्हते. अनेकजण मोती तलावाच्या कुठल्याही बाजूंनी गणपती टाकण्यासाठी पाण्यात जात होते. याप्रसंगी पोलिस कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत होते. दरम्यान, ४. ३० वाजेच्या दरम्यान शहरातील अमोल रणमुळे हा युवक खोल पाण्यात जाऊन त्याचा मृत्यू झाला. 


यानंतर ५ वाजेच्या सुमारास आलेल्या संभाजीनगर भागातील लक्कडकोट भागातील कैलास गणेश मंडळ आले. दरम्यान, माेती तलावाच्या परिसरात अगोदरच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गणपती विसर्जनासाठी बहुतांश तरुण पाण्यात उतरले. परंतु यात अचानक निहाल खुशाल चौधरी (२६), शेखर मधुकर भदनेकर (२०, संभाजीनगर, जालना) हे दोन्हीही तरुण खोल पाण्यात गेले. यानंतर सोबत असलेल्या तरुणांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते दोघेही खोल गेल्याने बुडाले. या घटनेमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. परंतु या तरुणांना वाचविण्यासाठी पोलिस प्रशासनासह पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले. दोन्ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी नियोजन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी वाढलेल्या वादामुळे उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, साईनाथ ठोंबरे, बोर्डे यांनी तगडा बंदोबस्त लावला होता. 


चौकशी करणार
या घटनेबाबत चौकशी करणार आहे. दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच याबाबत जिल्हाधिकारी स्तरावरुनही दखल घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. 


गाळा देण्याचा ठराव मांडणार
संतप्त झालेल्या नातेवाइकांनी पालिका, पोलिसांविषयी रोष व्यक्त करीत दुसऱ्या दिवशी १२. ३० वाजता मृतदेह ताब्यात घेतले. परंतु संभाजीनगर भागातील दोन्ही मृतांचे नातेवाईक आक्रमक होऊन त्यांनी थेट मृतदेह पालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आणून आंदोलन केले. हा वाद चिघळत असल्याचे पाहून पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला. परंतु लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर अर्ध्या तासाने मुख्याधिकारी संतोष खांडेकर आल्यानंतर नातेवाईक आक्रमक होऊन खांडेकर यांना घेराव घातला. मृतांना प्रत्येकी मदत तर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गाळा देण्याचा ठराव मांडणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतले. 


उपनगराध्यक्षांचे आश्वासन
उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी नातेवाइकांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करीत येणाऱ्या सभेत प्रस्ताव मांडून पालिकेकडून होईल ती मदत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. यावेळी भास्कर अंबेकर यांनीही मध्यस्थी केली. यावेळी गणेश राऊत, विष्णू पाचफुले, महावीर ढक्का, मेघराज चौधरी, अभिमन्यू खोतकर अशोक पवार आदींची उपस्थिती होती. 


दोन विद्यार्थी, एक कामगार
मृत झालेल्यांमध्ये अमोल रणमुळे हा नुकताच औद्याेगिक वसाहतीत काम करु लागला होता. दुसरे दोघेजण निहाल चौधरी व शेखर भदनेकर हे दोघेही जेईएस महाविद्यालयात शिक्षण घेत होते. 


प्रशासनासह पोलिसांकडून मदत न मिळाल्याने नागरिकांची नाराजी 
पोलिस तर नाहीच, पालिकेचे गार्डही आले नाही. माझे मित्र बुडाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी पोलिसही आले नाही. ना पालिकेचे कर्मचारी. आमच्या मंडळातील आठ युवक पूर्णपणे खोलात जाऊन मदतीसाठी प्रयत्नशील होते. पोलिस केवळ हातवारे करीत होते, तर नगरपालिकेच्या लाईफ गार्डकडून मर्यादित पाण्यापुरते जवळ आले. परंतु जसजसे खोल खोल पाण्याकडे जात होतो. तसतसा लाईफ गार्डनेही दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासाने एकास तर पाऊण तासानंतर दुसरा सापडला. पहिल्यास अॅम्ब्युलन्स मिळाली. परंतु दुसऱ्याला नेण्यासाठी अॅम्ब्युलन्सही नसल्याने त्याला खासगी रिक्षातून न्यावे लागले. यामुळेच नातेवाइकांतून अजून तीव्र चिड प्रशासनाविषयी निर्माण झाली होती, असे बचाव कार्यासाठी मदत करणारे संभाजीनगर भागातील विनोद गांधी हर्देकर यांनी सांगितले. 


अशी होती सुरक्षा 
नगरपालिका : सहा सीसीटीव्ही, दोन अग्निशमन दलाच्या गाड्या, एक बोट, वीस फँटल, २० लाइव्ह जॅकेट असा लवाजमा संरक्षणासाठी लावण्यात आला होता. 
पोलिस प्रशासन : पोलिस प्रशासनाकडून १९ पोलिस निरीक्षक, २६ सहायक पोलिस निरीक्षक, ३६ पोलिस उपनिरीक्षक, ९१५ पोलिस कर्मचारी, ५० प्रशिक्षणार्थी, १७५ होमगार्ड, १ एसआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त होता. 


असा होता निष्काळजीपणा 
पालिका : प्रशासनाकडून तलावात खोल पाण्यापर्यंत धोकादायक रेषा लावली होती. या रेषेमध्येच अनेक खोल खड्डे असल्यामुळे भक्त अचानक गाळात फसण्याचा धोका वाढलेला होता. 
पोलिस : पोलिसांनी घटना घडेपर्यंत एकाच साईडने विसर्जनाचे आवाहन केले नाही. पाण्यात जात असताना त्या व्यक्तींना हटकलेही नाही. सर्वच बाजूंनी पाण्यात जाणाऱ्यांमुळे कोण बुडाला हे दिसून येत नव्हते. या घटनांमुळे नेमके सीसीटीव्ही कशासाठी होते. त्यावरुन पोलिस प्रशासनाला या बाबी दिसत नव्हत्या

बातम्या आणखी आहेत...