आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूतकताईच्या माध्यमातून सेवाग्राममध्ये 2500 विद्यार्थ्यांनी मिळवली एकाग्रता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा : महात्मा गांधींनी देशातील नागरिकांना स्वातंत्र्य लढ्याचे दिलेले शस्त्र म्हणून दिलेली सूतकताई आता इतिहासजमा झाली आहे, असे कोणी समजत असेल तर त्यांचा हा भ्रम ठरेल. येथील महान वस्तुसंग्रहालयाच्या विभागप्रमुख सुषमा सोनटक्के यांनी अडीच हजार विद्यार्थ्यांना सूतकताई शिकवली असून तिला विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि जीवनानंदाच्या अनुभूतीशी त्यांना जोडले आहे. वर्धा शहरात वस्तुसंग्रहालय आहे. खादी आणि ग्रामोद्योगाशी संबंधित विविध साधनांचा हा संग्रह महात्मा गांधींच्या कल्पनेतून सन १९३६ साकारला. त्यातून जनसामान्यांचे शिक्षण व्हावे, अशी महात्मा गांधींची अपेक्षा होती. त्या दृष्टीने काम करताना सोनटक्के यांनी १४ शाळांतील पाचवी ते आठवीच्या अडीच हजार विद्यार्थ्यांना टकळीच्या साह्याने सूतकताई शिकवली. मुलांनी तयार केलेले सूत अत्यंत दर्जेदार असते, असेही समोर आले आहे. आतापर्यंत साडेपाच किलो सूत तयार झाले असून त्यातील अडीच किलो सूतापासून १७ मीटर कापड तयार करण्यात आले आहे. हे कापड हात लावून या मुलांनी पाहिले तेव्हा त्यांना नवनिर्मितीचा अत्यानंद झाला होता. महात्मा गांधींनी सांगितलेले विचार हे केवळ मिथक नसून तो जीवनानंद आहे. याचीच अनुभूती हे विद्यार्थी घेताहेत. या वयात या मुलांवर होणारा संस्कार त्यांना गांधी विचारांच्या जवळ नक्कीच आणेल, असा विश्वासही त्यांना वाटतो.

सूतकताईमुळे विद्यार्थ्यांनी कमावले प्रत्येकी १०० रुपये
या शाळेतील शिक्षकांना प्रारंभी हे प्रशिक्षण निरुपयोगी वाटत होते. पण सूतकताईमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्याचा अनुभव शिक्षकांनी घेतला. त्यामुळे शिक्षकांकडूनच आता सूतकताई प्रशिक्षणाची मागणी होत आहे. या विद्यार्थ्यांनी टकळीवर वाती तयार करून प्रत्येकी १०० शंभर रुपये कमाई केली आहे, असेही सुषमा सोनटक्के म्हणाल्या. मुलांच्या मदतीने तयार झालेले कापड आता वस्तुसंग्रहालयात ठेवले आहे.

दीडशेव्या जयंतीदिनीही सेवाग्राम जपणार बापूंचा कृतिशील साधेपणा
नागपूर सेवाग्राम : बापूंना जन्मदिवस साजरा करणे आवडत नव्हते. त्यांनी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. जगण्यातील अत्यंत साधेपणा हे त्यांचे वैशिष्ट्यच होते..हे लक्षात घ्या..त्यामुळे बापूंची १५० वी जयंती असली तरी इतर दिवसांप्रमाणेच ती आश्रमात साजरी होणार..केवळ एक व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. त्याचे कुठलेही अप्रूप नाही...'

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला सेवाग्रामच्या बापूकुटीशेजारी संवाद साधताना आश्रम समितीचे अध्यक्ष टी. एन. आर. प्रभू यांनी स्पष्टपणे सांगितले. जयंती कितवीही असाे, आम्हाला ती सारखीच. लोक गांधी जयंतीला येणार, इव्हेंट साजरा करणार. जगात इव्हेंट तर सर्वत्र साजरे होतात. त्यातून तुम्ही काय साध्य करणार? आज बापूंच्या जयंतीच्या निमित्ताने केवळ इव्हेंट साजरे होतात. गांधी एन्कॅश करण्याचे प्रयत्न होतात, हे वेदनादायी आहे. आमच्यासाठी बापूंचे विचार महत्त्वाचे. ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जीवनभर मांडलेत...' याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले.

गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे अप्रूप साऱ्या जगाला असले तरी सेवाग्राम आश्रमाने सेलिब्रेशन टाळले आहे. सकाळची प्रार्थना, प्रभातफेरी, आश्रम परिसराच्या साफसफाईसाठी श्रमदान, गोव्याच्या मुझियमचे प्रमुख डॉ. केरकर यांचे गांधीजींचे आरोग्याचे विचार यावरील व्याख्यान असे सर्वसाधारण कार्यक्रमांचे स्वरूप असल्याचे प्रभू यांनी सांगितले. प्रत्यक्ष बापूंचे दहा वर्षे वास्तव्य राहिलेली बापूकुटी आणि आश्रम परिसरावर दीडशेव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कुठल्याही वेगळेपणाचा मागमूसही जाणवत नाही. कुठेही दिव्यांची रोषणाई नाही. लोकांची फार वर्दळ नाही. अगदी वर्षातील इतर दिवसांप्रमाणेच आश्रमाची दिनचर्या सुरू होती.

सर्वकाही रोजच्या प्रमाणेच
प्रत्यक्ष सेवाग्राम गावातही मध्येही दीडशेव्या जयंतीच्या कुठल्याही खाणाखुणा जाणवत नव्हत्या. सारे काही रोजच्याप्रमाणेच सुरू होते. मात्र, त्याचवेळी गांधी विचारांचा कृतिरूप वसा घेतलेल्या मगन संग्रहालय समिती, सर्व सेवा मंडळ, ग्रामसेवा मंडळ सारख्या संस्थाकडून शिबिर, सूतकताईसारखे उपक्रम आयोजित होणार आहेत. काँग्रेसच्या सेवादलाच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...