आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी सोडून पूर्णवेळ उद्योगात दिले झोकून; वर्षाला सव्वादोन कोटींचा नफा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर -  पशुपालनाकडे शेतकरी जोडधंदा म्हणून पाहतात, परंतु या जोडधंद्याला मुख्य उद्योग करण्याची किमया पाथर्डी येथील दोन तरुणांनी केली. सतीश एडके व राहुल खामकर यांनी दुष्काळी भागात आधुनिक बंदिस्त शेळीपालनाचा यशस्वी प्रयोग केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर स्वतःच्या उद्योगाला कंपनीचे रूप देऊन त्यांनी राज्यासह संपूर्ण भारतात आतापर्यंत ३५०० शेतकऱ्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांनाही उत्पन्नाची हमी दिली. त्यामुळे ३५०० शेतकरी स्वतःचा आधुनिक बंदिस्त शेळीपालन करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. पाथर्डी येथील वृद्धेश्वर कारखाना रस्त्यावर असलेल्या या उद्योगाने आता भरारी घेतली असून एडके व खामकर या दोघांना यातून वर्षभरात सुमारे सव्वादाेन कोटींचा निव्वळ नफा मिळत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करत सुमारे ५०० शेळ्यांचे जित्राब हे दोघे सांभाळत आहेत. खामकर यांनी कृषी सहायकपदाची शासकीय नोकरी सोडून पूर्णवेळ या उद्योगात झोकून दिले आहे. 
 

शेळीपालनाचे रूपांतर झाले कंपनीत
पाथर्डी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत बंदिस्त शेळीपालनाचा यशस्वी प्रयोग एडके व खामकर यांनी केला. शेळीला गरिबांची गाय म्हटले जाते. अनेक शेतकरी शेळीपालन करतात, परंतु शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसल्यामुळे ते कालांतराने हा व्यवसाय सोडतात. जोडधंदा म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते, परंतु शेळीपालन हा मुख्य उद्योग ठरू शकतो हे एडके व खामकर यांनी दाखवून दिले. पाथर्डीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या या व्यवसायाचे आता एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले.

 

काटेकोर व्यवस्थापनाने यश
एडके यांनी १९९७-९८ मध्ये पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली. गावरान हॅचरीद्वारे त्यांनी दीड लाख पिल्लांचे उत्पादन घेतले. दहा वर्षे  राबल्यानंतर त्यांना अनिश्चित बाजाराचे संकट सहन करावे लागले. त्यामुळे त्यांनी मित्र राहुल खामकर यांच्या मदतीने २००९ पासून २० ते २५ शेळ्या विकत घेऊन बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात केली. अनेक अडचणीवर मात करून जिद्दीच्या बळावर त्यांनी २५ शेळ्यांचा हा व्यवसाय उद्योगात रूपांतरित केला. प्रत्येक गोष्टींचे काटेकोर व्यवस्थापन करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला व त्यावर लक्ष केंद्रित केले.

 

असे मिळते ८०० शेळ्यांच्या पालनातून उत्पन्न
१४ महिन्यांत २८८० करडं यांचे प्रति करडू वजन २४ किलो मिळते. एकूण करडांचे किमान वजन ६९,१२० किलो. करडांचा विक्री दर ४५० रुपये प्रतिकिलो मिळताे. यातून ३.११ कोटींचे उत्पादन होते. ८५ लाख ८२ हजार खर्च वजा करता २.२५ कोटींचे उत्पन्न मिळते. लेंडी खतापासूनही उत्पादन मिळते. एडके यांचा फार्म ८०० शेळ्यांचा आहेत. एक शेळी दररोज ४०० ग्रॅम लेंडी खत देते. एकूण शेळ्यांचे प्रतिदिन ३२० किलो खत मिळते. प्रतिदिन ३२०, तर ४२० दिवसांचे १ लाख ६८ हजार किलो खत मिळते, असे सतीश एडके, राहुल खामकर यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांना सर्व मदत
सध्याच्या काळात हायजिनिक मटणाला बाजारपेठेत चांगली मागणी असून यापुढे बंदिस्त शेळीपालनाला महत्त्व प्राप्त होणार आहे, असे सतीश एडके सांगतात. एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा उद्योग उभारण्यासाठी सर्व मदत केली जाते. यामध्ये शेडच्या बांधकामाचे नियोजन, शेळीपालनाचे शास्त्र, सर्व प्रकारच्या जातीच्या शेळ्या व बोकड, लसीकरण व सुदृढ शेळ्या देण्यात येतात. २५ शेळ्या आणि एक बोकड त्यावर खरेदी केल्यास सहा महिने कंपनीच्या मार्फत मार्गदर्शन देण्यात येते. 

 

८०० शेळ्यांचा दिवसाला १३,४०० रुपयांवर खर्च
१४ महिन्यांचे उत्पादन यामध्ये दोन वेत गृहीत धरण्यात आले आहेत. एका शेळीचा प्रतिदिन खर्च १६.८० रुपये आहे. ८०० शेळ्यांचा एका दिवसांचा खर्च १३ हजार ४४० रुपये होतो. या शेळ्यांचा एकूण ४२० दिवसांचा खर्च सुमारे ५६ लाख ४४ हजार ८०० रुपये आहे. त्यांच्यापासून होणारे ३२०० करडे, यामध्ये १० टक्के मरतुक  गृहीत धरल्यास २८८० करडे होतात. यात प्रतिदिन एका करडाचा १०.२० रुपये खर्च असा २८८० करडांचा प्रतिदिन खर्च २९ हजार ३७६ रुपये आहे. असा एकूण शंभर दिवसांचा करडांचा खर्च २९ लाख ३७ हजार ६०० रुपये होतो. यामध्ये शेळ्यांवर होणार खर्च  ५६ लाख ४४ हजार ८०० रुपये, तसेच करडांचा २९ लाख ३७ हजार ६०० असा खर्च हाेतो.


शेळ्या खरेदीचीही हमी 
एडके व खामकर हे व्यवसाय सुरू केलेल्या शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेळ्या विकत घेण्याचा करारसुद्धा करतात. त्यांच्या शेळ्यांचे मटण थर्ड पार्टीअंतर्गत दुबईलाही विक्री करण्यात येते. शेळीपालनासाठीचे प्रशिक्षण, मदत, कर्ज, अनुदान, कोटेशन व त्यानंतर शेळ्या खरेदी करण्याचीही हमी कंपनीकडून घेण्यात येते. त्यामुळे या व्यवसायात एक प्रकारची सुरक्षितता मिळण्याची भावना निर्माण हाेते.

बातम्या आणखी आहेत...