नाशिक / १९५४ मध्ये टिळकांनी मांडला होता संख्यावाचनातील बदल; विनोबा भावेंनीही केले होते समर्थन, पण म्हणाले होते ‘अमलात येणे कठीण’

शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक यांच्या कन्या मुक्ता यांची सध्याच्या वादावर माहिती
 

विशेष प्रतिनिधी

Jun 24,2019 10:10:00 AM IST

नाशिक - अंकगणितातील संख्यावाचनातील बदलावरून शिक्षण क्षेत्र तेे विधिमंडळ अशी सर्वव्याप्त चर्चा सुरू असताना साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू शिक्षणतज्ञ अशोक देवदत्त टिळक यांनी तब्बल पासष्ट वर्षांपूर्वी हा विचार केल्याची माहिती त्यांच्या कन्या मुक्ता टिळक यांनी “दिव्य मराठी’ला दिली. इतकेच नाही तर त्या वेळी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विनोबा भावेंनी त्याचे समर्थन केल्याचे व “गीताई’तही हीच रचना वापरल्याचे सांगितल्याचे अप्पा ऊर्फ अशोक टिळक यांनी “चर्वेतुहि’ या त्यांच्या लेखसंग्रहात नमूद केले आहे. विशेष म्हणजे “हा विचार फार चांगला आहे, पण अमलात येणे कठीण. कारण लहान मुलांच्या अडचणींची प्रौढांना तमा नसते’ अशी त्या वेळी विनोबांनी अप्पांना दिलेल्या प्रतिक्रियेचीची आज प्रचिती येत असल्याचे त्या म्हणाल्या.
शिक्षक म्हणून अनेक गावांत सेवा बजावल्यामुळे अप्पा टिळकांनी मुलांच्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी शिक्षणातील अनेक प्रयोग केले. त्यापैकीच एक प्रयोग होता नवीन अंकप्रणालीचा. मराठीतील संख्यावाचनात मुलांना येणारे अडथळे लक्षात घेऊन “दोन तीस, तीस चार’ या धर्तीवर अंकलिपी विकसित केली होती. शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच आपली लेक मुक्ता हिच्या शिकवणीसाठीही ती वापरली होती.

‘गीताई’त ‘एकोणीस’ऐवजी ‘नौदा’ असा उल्लेख
त्या प्रसंगाबद्दल अप्पा टिळक यांनी लिहिले आहे, “बाबांनी कागद निरखून पाहिला, बारकाईनं वाचला व म्हणाले, “विचार फार चांगला आहे. मात्र, हा अमलात कधीच येणार नाही. कारण लहान मुलांच्या अडचणींचा प्रौढांना काहीच तमा नसते.’ इतकेच नाही तर स्वत: विनोबांनी गीताईत हाच प्रयोग केल्याचे त्या भेटीत अप्पांना सांगितले. गीताईत त्यांनी “एकोणीस’ ऐवजी ‘नौदा’ हा शब्द वापरला होता. पुढे विनोबा अप्पांना म्हणाले, “इंग्लिशमध्ये व काही आपल्या भाषांतही ही व्यवस्था आहेच. कन्नड भाषेत “इप्पत’ म्हणजे “वीस’ व “मुरू’ म्हणजे तीन. इप्पतमुरू म्हणजे तेेवीस’. ६५ वर्षांनंतर संख्यावाचनात सुचवले जाणारे बदल आणि त्याला होणारा विरोध अप्पा आणि विनोबा या दोघांचाही द्रष्टेपणा स्पष्ट करणारी आहे.

अप्पांची दूरदृष्टी, विनोबांचा शेरा दोन्ही विशेष
संख्यावाचनातील बदलाच्या अनुषंगाने सुरू असलेला सध्याचा वाद बघितला तर अप्पांनी ६५ वर्षांपूर्वी त्यावर केलेला विचार आणि विनोबांची टिप्पणी हे दोन्ही किती चपखल होते याची प्रचिती येते. हयात असताना त्यांनी अनेकदा याचा उल्लेख केला होता. आताच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा संदर्भ एक शिक्षिका म्हणून महत्त्वाचा वाटतो.
- मुक्ता टिळक

X
COMMENT