Magazine / ...तब तक मेरे नाम तू !

र्व काही मोजूनमापून तार्किक मेंदूचा परफेक्ट वापर करून योजना आखल्या जात आहेत

महेशकुमार मुंजाळे

Sep 01,2019 12:07:00 AM IST

"मे रे नाम तू' हे शाहरुखच्या "झीरो' फिल्म मधलं गाणं ऐकलंय का आपण? नसेल ऐकलं तर ऐका, फक्त ऐकू नका; तर कान देऊन ऐका. यातला प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या अस्तित्वासमोर निसर्गाचं अस्तित्वसुद्धा खुजं आहे असं सांगतोय आणि पुढे म्हणतोय "जब तक जहां में मेरा नाम हो, तब तक मेरे नाम तू'. एखादी गोष्ट नावावर करून घेणे म्हणजे तिचा संपूर्ण ताबा, मालकी हक्क स्वतःकडे ठेवून घेणे होय. प्रेयसीला नावावर करून घेण्याचा दावा करता करता समोर जाऊन तो म्हणतोय, "तेरे आगे ये दुनिया है फीकी सी, मेरे बिन तू ना होगी किसी की भी, अब ये ज़ाहिर सरेआम है, ऐलान है...' यात तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत नसून, तो थेट धमकी देतोय अशी खात्री व्हावी एवढं सरळ सरळ अर्थाचं ते
वाक्य आहे.


समाजात घडणाऱ्या गोष्टींच प्रतिबिंब चित्रपटांत असतं म्हणूनच त्याला समाजाचा आरसा असं म्हणतात. हे प्रतिबिंब एवढं तंतोतंत आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आपण चित्रपटांतूनसुद्धा अभ्यास करू शकतो. जसे की प्रेम व्यक्त करण्याचे ढोबळ मानाने तीन प्रकार आपल्याला चित्रपटांतून दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे अगदी सभ्य, कायद्याच्या चौकटीला धरून व्यक्त होणारं प्रेम. एखादी मुलगी आवडू लागली तर तिच्यापर्यंत प्रत्यक्ष भेटून बोलून, चिट्ठीतून किंवा फोनवरून स्वतःची भावना पोहोचवायची आणि तिच्या होकाराची वाट पाहायची. होकार मिळाला तर ठीक, नाहीतर ती "हो' म्हणेपर्यंत आपला चांगुलपणा दाखवत तिच्यावर आपला सातत्याने प्रभाव पाडत राहायचे. ही अतिशय साधीसुधी पद्धत आपल्याला अनेक चित्रपटांत दिसेल.
दुसरी पद्धत याच्या अगदीच विरुद्ध बाजूची. यात मुलीच्या मताला अजिबातच किंमत नसल्यात जमा आहे. तू मला आवडली आहेस. "तू हां कर या ना कर, तू है मेरी किरण' एवढं ते भयाण दरडावून सांगणं आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला "कबीर सिंग' सुद्धा सुरुवातीला त्याच्या ज्युनियर विद्यार्थिनीला प्रियाला न विचारता गर्ल्स हॉस्टेलखाली तिच्या गालावर किस करतो तेव्हा प्रेक्षागृहात काही लोक शिट्ट्या मारतात तर काही लोकांचा पारा चढतो. "कन्सेंट', म्हणजे संमतीशिवाय केलेलं कुठलंही कृत्य कायद्यानुसार अपराध असतो याची जाणीव त्या फिल्म मधील पात्राला नाही कारण त्याच्या लेखक दिग्दर्शकाची स्वतःची वैचारिक बैठकच काहीशी टोकाची विक्षिप्त आहे. असो.. तर मुद्दा असा की, एखादी मुलगी आपल्याला आवडली तर तिचा होकार-नकार आपण गृहीत न धरता तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन आपण आपलं नकोसं प्रेम व्यक्त करू लागतो तेव्हा तो गुन्हा असतो. याच विचारधारेचं शेवटचं टोक म्हणजे अॅसिड हल्ला आहे. ती सातत्याने आपल्याला नकार देत असेल तर ती आपल्याव्यतिरिक्त कुणाचीच होऊ शकत नाही. मग तिला विद्रूप करा किंवा तिचा जीव घ्या. अशा कित्येक घटना आपण साधारण रोजच वर्तमानपत्रात वाचत असतोच.

वरच्या दोन्हीही पद्धती एकदम टोकाच्या झाल्या. पहिल्याला सभ्य प्रियकर म्हणूयात तर दुसऱ्याला अतिरेकी. या दोन्हीच्या व्यतिरिक्त तिसरासुद्धा एक प्रकार आहे ज्याला सहजासहजी चांगला किंवा वाईट या बायनरीमध्ये बसवणं फार कठीण आहे. या प्रकारचा प्रियकर त्याच्या प्रेयसीला "प्रेमात पाडून घेतो'. वरकरणी वागण्या-बोलण्यातून जगासोबत वावरताना सभ्य, सन्मार्गी, सालस वाटणारा तरुण अशा काही युक्त्या करून वातावरणनिर्मिती करतो की समोरची मुलगी स्वतःहून त्याच्या प्रेमात पडेल. गुंडांना सुपारी देऊन आडरानात मुलीचा छळ करायला लावून स्वतः हीरोसारखी एन्ट्री मारायची आणि तिला त्या गुंडांपासून वाचवायचं अशी स्ट्रॅटेजी पूर्वीच्या सिनेमांत वापरली जायची. आता ही अशी बालिश आयडिया वापरण्याइतके मूर्ख हीरो राहिले नाहीत. सर्व काही मोजूनमापून तार्किक मेंदूचा परफेक्ट वापर करून योजना आखल्या जात आहेत आणि मुलगी आपोआप गळ्यात पाडून घेतली जात आहे.


"इशकजादे' नावाच्या सिनेमात तुम्हाला असा नायक नक्कीच पाहायला मिळेल, जो नायिकेला स्वतःहून प्रेमात पाडून घ्यायला परावृत्त करतो. या अशा पद्धतीची आशिकी असणारी गोष्ट आपल्याला नेटफ्लिक्स वर "YOU' नावाच्या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळेल. सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेली ही अमेरिकन सिरीज "कॅरोलिन केप्न' यांच्या "इपोनिमस २०१४' या कादंबरीवर आधारित आहे. यात पुस्तकांचे दुकान चालवणारा "जो' नावाचा तरुण त्याच्या दुकानात पुस्तके खरेदी करण्यासाठी आलेल्या "बेक'च्या प्रेमात पडतो. चालताबोलता प्रत्येकाला मदत करणारा, त्याच्या शेजारी राहणाऱ्या आठ-दहा वर्षीय "पॅको'ला वाचण्यासाठी पुस्तके नेऊन देणारा, त्याची अगदी रक्ताचे नाते असल्याप्रमाणे काळजी घेणारा. रस्त्यावर चालताना अगदी कुणालाही मदत करेल असा स्वभाव असणारा "जो' बेकच्या प्रेमाला मिळवण्यासाठी काहीसा वेडेपणा करताना दिसू लागतो. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर, तिच्या घराबाहेर, तिच्या मित्रांवर पाळत ठेवणे. तिच्या नकळत तिच्या आयुष्यात प्रवेश करणे असे उद्योग तो हळूहळू करू लागतो. सर्वगुणसंपन्न, कष्टाळू "जो' त्याच्या "बेक'वरच्या निस्सीम प्रेमामुळे आपलासा वाटू लागतो आणि त्याच वेळी त्याने केलेल्या अतिरेकी स्ट्रॅटेजीजमुळे आपण त्याचा त्रागाही करू लागतो. प्रेक्षकाच्या मनात मालिकेच्या मुख्य
पात्राविषयी असे दोन्ही विचार एकाच वेळी आणणं लेखक-दिग्दर्शकाला फार भन्नाट जमलं आहे. "जो'चं प्रेम हळूहळू एवढ्या डार्क शेडकडे प्रवास करू लागतं की सुरुवातीची गोड गुलाबी वाटणारी साधीशी प्रियकराची रोमँटिक कथा हळूहळू क्राइम थ्रिलर होऊ लागते.


मागे एका भाषणात जावेद अख्तर असं म्हणाले होते की पूर्वीच्या फिल्म्समध्ये आणि आताच्या फिल्म्समध्ये काही प्रमुख बदल होत गेले. त्या बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा बदल होता "व्हिलन'चा. अगदी सुरुवातीच्या काळात डाकू, लुटारू, गुंड हे व्हिलन होते. मग सावकार, जमीनदार व्हिलन झाले. कालांतराने पोलिस, भ्रष्ट अधिकारी व्हिलन म्हणून येऊ लागले. आताच्या काही वर्षांपूर्वी दहशतवादी, पाकिस्तानी सैनिक व्हिलन म्हणून उदयाला आले. पण आता काळ अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे की आपल्या सिनेमाना व्हिलनच राहिला नाही. कारण आपल्या हीरोमध्येच ते व्हिलनचे गुण ओतले गेले आहेत.
अख्तर साहेबांचं विवेचन भारतीय सिनेमासाठी जरी असलं तरी या अमेरिकन "You' सिरीजला चपखल बसतं. ना ब्लॅक ना व्हाइट, ग्रे शेड असणारे मुख्य पात्र तयार करणे खरोखर मोठे आव्हान आहे. ते आव्हान "यू'च्या निर्मात्यांनी लीलया पेलले आहे.


"तेरे लिये कुछ भी कर सकता हूं प्रीती.. अगर तुझमें भी मेरे लिये वैसा पागलपन है ना तो कॉल मी ऑदरवाइज यू नो मी' असं म्हणणारा कबीर सिंग तेव्हाच प्रेक्षकांच्याही मनाला भावतो जेव्हा प्रीतीचा कबीरच्या वेड्यासारख्या प्रेमाला संपूर्ण पाठिंबा असतो. जर तो पाठिंबा नसेल तर काही काळाचा वेडा प्रेमी अनंत काळाचा मॉलेस्टर किंवा अगदी मोठा गुन्हेगार ठरू शकतो. प्रेमात पागलपणा नक्कीच असावा पण ते पागलपण समोरील व्यक्तीच्या आयुष्याचा मालकी हक्क स्वतःकडे घेण्या इतका क्रूर नसावा. '...तब तक मेरे नाम तू' म्हणायला ती काही जहागीर नाहीये, जिती जागती व्यक्ती आहे एवढं आपण लक्षात ठेवलं तरी खूप.
लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

X
COMMENT