आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या वेळकाढू भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला वेगळे वळण!  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भाजप व राष्ट्रवादीचा एक गट यांचे महाराष्ट्रात सरकार अचानक सत्तारूढ हाेण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीतील पाच चुका कारणीभूत असल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळातून काढला जात आहे. २४ अाॅक्टाेबर राेजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर व शिवसेनेसाेबत सत्तेत जाण्यास अनुकूलता दर्शवूनही या दाेन्ही पक्षांनी निकालाच्या ३० दिवसांनंतरही राज्यपालांकडे पाठिंब्याबाबत लेखी पत्र दिलेले नाही, केवळ चर्चेतच वेळ घालवला. हीच संधी साधून भाजपने 'डाव' साधल्याचे मानले जाते.

शिवसेनेला पाठिंबा देण्यास राष्ट्रवादीने सुरुवातीला अनुकूलता दर्शवली. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेतेही या भूमिकेशी सहमत हाेते. मात्र पक्षाध्यक्षा साेनिया गांधींचे मन वळण्यात त्यांचा वेळ गेला. मुंबई- दिल्ली- मुंबईत आघाडीच्या बैठका घेऊन केवळ चर्चेचा खल करण्याचा खेळ काँग्रेस नेत्यांकडून खेळण्यात आला. त्यामुुळे भाजपला राजकीय डावपेच आखण्यास वेळ मिळाला.

उद्धव ठाकरेंचे संकेत कळले नाहीत


निवडणुकांचे निकाल जाहीर हाेताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळालेच पाहिजे, याची आठवण भाजपला करून दिली. तसे न झाल्यास आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचा इशाराही ठाकरेंनी दिला हाेता. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप सतर्क झाली. परंतु शिवसेनेचे हे संकेत काँग्रेसला कळू शकले नाहीत. ही काँग्रेसची दुसरी चूक म्हणावी लागले.

भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यास राष्ट्रवादी तयार झाल्यानंतरही काँग्रेसने मात्र आपली भूमिका तातडीने ठरवली नाही आणि पाठिंब्याचे लेखी पत्र दिले नाही. ही तिसरी चूक मानली जाते. ज्या दिवशी शिवसेनेेचे नेते राज्यपालांना भेटले तत्पूर्वीच जर काँग्रेसने शिवसेेनेला पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना पाठवले असते तर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा मजबूत झाला असता. यादरम्यान राज्यपालांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी जी मुदत दिली त्या वेळेत काँग्रेस किमान समान कार्यक्रमाबाबत शिवसेनेशी चर्चा करू शकली असती.

सत्ता राहिली दूर, मंत्रिपदावरून खल


काँग्रेसच्या मागणीनुसार शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला तेव्हा कुठे शिवसेना खराेखरच भाजपसाेबत युती ताेडत असल्याची खात्री काँग्रेसला पटली. महाविकास आघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना काही मंत्रिपदासाठी अडून बसण्याची चाैथी चूक काँग्रेस नेत्यांनी केली. यामुळे तिन्ही पक्षांत खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू झाली. लवकरात लवकर सत्तास्थापनेचा दावा करण्याएेवजी हे पक्ष बैठकांतच मश्गुल राहिले.

नारायण राणेंचे वक्तव्य दुर्लक्षित करणेही भाेवले
 
'मुख्यमंत्री भाजपचाच हाेणार' या नारायण राणेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणे ही काँग्रेसची पाचवी चूक ठरली. खरे तर राणेंनी जाहीरपणे सांगितले हाेती की, 'फडणवीसांनी मला बाेलावून सांगितले की भाजपचे सरकार बनवण्यासाठी जे काही करायचे असेल ते करा.' यावरून हे सिद्ध झाले हाेते की, भाजपचे नेते सत्तेसाठी डाव टाकत आहेत. तरीही काँग्रेसने अद्याप विधिमंडळ नेताही निवडला नाही. केंद्रात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल काेश्यारी हे भाजपचे नेते हाेते. महाविकास आघाडीच्या सत्तेची तयारी करणाऱ्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीनेही ही गाेष्ट लक्षात घेतली नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यापर्यंत पाेहाेचलेल्या या तिन्ही पक्षांना ताेंडघशी पडावे लागले.

बातम्या आणखी आहेत...