अवघ्या तीन मिनिटांत / अवघ्या तीन मिनिटांत सप्तशृंगीचे दर्शन; फनिक्युलर ट्रॉलीमुळे 500 पायऱ्या चढून जाण्याचे कष्ट झाले कमी

Jan 01,2019 02:36:00 PM IST

नाशिक- सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांना बराच काळ रांगेत ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे भाविकांची सुविधा व्हावी यासाठी राज्य शासनाने फनिक्यूलर ट्रॉलीची व्यवस्था केली असून 2018 मध्ये तिचा शुभारंभ केला.

महाराष्ट्राचे अर्धे शक्तिपीठ सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी तासन‌्तास रांगेत उभे राहण्याची व 500 पायऱ्या चढून जाण्याचे कष्ट नव्याने सुरू झालेल्या फनिक्युलर ट्रॉलीमुळे कमी झाले आहेत. ट्रॉलीमुळे फक्त तीन मिनिटांत सप्तशृंगी देवीचे दर्शन होत आहे. हा प्रकल्प सरत्या वर्षातला अविस्मरणीय प्रकल्प आहे.

शासनाने बीओटी तत्त्वावर फनिक्युलर ट्रॉली प्रकल्प सुरू केला. या ट्रॉलीमुळे भाविकांनी दर्शन घेणे सुलभ झाले आहे. एकाचवेळी 80 प्रवाशांना या ट्रॉलीने मंदिरात दर्शनासाठी जाता येते व तेवढेच भाविक परत येऊ शकतात. दिवसभरात या ट्रॉलीच्या माध्यमातून 24 तासात 30 ते 35 हजार भाविक दर्शन घेतात. या ट्रॉलीमुळे वृद्ध, अपंग, बालके, महिलांना दर्शन घेणे सुलभ झाले आहे.

अशी आहे यंत्रणा
येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून वेटिंग रूमची व्यवस्था आहे. तिकीट घेणाऱ्या भाविकांना एकाच वेळी दोन्ही बाजूचे तिकीट देण्यात येते. यामध्ये तिकीट घेणाऱ्या भाविकाने 24 तासांच्या आत तिकिटाचा वापर करणे बंधनकारक असते. ट्रॉलीने दर्शनासाठी गेलेल्या भाविकाने ट्रॉलीनेच परत येण्याचे बंधन नसले तरी तिकीट मात्र दोन्ही बाजूंचे घेण्याचे बंधन आहे. या सर्व प्रकल्पासाठी प्रशिक्षित 200 कर्मचारी आहेत.

अशी आहे दर्शन व्यवस्था: फनिक्युलर ट्रॉली द्वारे मंदिरात पोहोचणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी सर्व भाविकांसारखेच रांगेत दर्शन घ्यावे लागते. तसेच दर्शन झाल्यानंतर ट्रॉलीने आलेल्या भाविकांना ट्रॉलीनेच परत जात यावे यासाठी उतरत्या पायरीला एक स्वतंत्र ट्रॅक बनविण्यात आला आहे.

असा आहे पूर्ण प्रकल्प
सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेऊन बनविण्यात आलेल्या फनिक्युलर ट्रॉलीचा ट्रॅकवरील वेग, समतोल, क्षमता, अँटीलॉक ब्रेक सिस्टिमसह आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना उतरण्यासाठी रुळाच्या एका बाजूने पायऱ्या बसविण्यात आल्या आहेत. विद्युतीकरणावर चालणारी ही ट्रॉली सिस्टिम डोंगरात उभारली गेली असून संपूर्ण वातानुकूलित आहे. वीज गेल्यास जनरेटरची सुविधा आहे. ट्रॉलीला कोकण रेल्वे पॅटर्ननुसार संरक्षणाची सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रवासी प्रतीक्षालय, बुकिंग ऑफिस, स्टाफ रूम, वेटिंग प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, शौचालय, हॉटेल व इतर सुविधा आहेत. येणारी ट्रॉली व जाणारी ट्रॉली एकमेकांना समांतर असून त्यामुळे ट्रॅकवरील समतोल साधण्यात आला आहे.

X